पान:मजूर.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थें.

३७

 " तुह्मी आपल्या आमच्या ताईला घेऊन जात जा ! तिच्यावर लोभ केलात म्हणजे माझ्यावर केल्यासारखाच आहे ! ताई आणि मी कांहीं तीन नाहीं ! "
 "आई, मी जातें हूं आतां ! मी तुमच्या सुगंधाताईसारखीच तुह्मां- ला आहे ! तशीच माझ्यावर माया करा बरं का ! - तुझी आतां लवकर बऱ्या व्हाल ! मी आतां वरचेवर तुम्हांला पाह्यला येत जाईन ! माझी आई मला लहानपणच सोडून गेली आहे. माझ्या सुगंधाताईची आई तीच माझी आई असें मी समजतें ! कराल ना माझ्यावर प्रेम ? – " आईनें यावर मंद हास्य करीत होकारार्थी मान हलविली ! " सुगंधाताई, संतुदादा," बबूताई आमच्याकडे वळून ह्मणाली, “मी सांगायला नकोच पण आईला यापेक्षां जास्त जपत जा बरें का ? वेळच्यावेळीं औषध, खायलाप्यायला दिलें गेलें पाहिजे नाहीं का ? उद्यां मी आमच्या फॅमिली डॉक्टरला घेऊन येऊ का ? – "
 "छे छे ! डॉक्टरला काय करायचे आहे ? - ह्मणजे आम्हीं डॉक्ट- राज्या फीला डरतों असें नव्हे ! पण आम्हांला डॉक्टर वैद्य वर्ज अस- तात ! मजुरांना नेहमी नॅचरोपॅथी मानवते ! शिवाय आमच्या आईची इच्छा मरायची असली तरी, सध्यां तिला फुरसद कुठे आहे मरायला ? तिच्या हातून कित्येक गोष्टी व्हायच्या आहेत. तिने अजून कित्येक गोष्टी करायच्या आहेत. तिने अजून कित्येक गोष्टी पहायच्या आहेत. तिनें अजून कित्येक गोष्टी दाखवायच्या आहेत ! - माझ्या सुगंधाताईच्या दोन दोन मुलांना दोहोंकडे घेऊन आमच्या इनामदारीच्या गांवी कडीपाटा- च्या झोपाळ्यावर बसून मुलांना अंगाई गीत तिला गायचीं आहेत ! आमच्या रत्नुच्या बायकोला, आणि रत्नुला मांडीवर बसवून त्यांच्या तोंडांत साखर घालावयाची आहे ! - आमच्या आईला आपल्या नात- वाची वरात हत्तीवरून निघालेली आमच्या इनामगांवी पहावयाची आहे! नाहीं का ग आई ? " हें अत्यंत गंभीरपणानें जरी दादा बोलत होता, तरी माझी व बबूताईची प्रत्येक वाक्यानें हंसून हंसून मुरकुंडी वळत होती !