पान:मजूर.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
मजूर


होतें. दुपारची चढाची वेळ निघून गेली होती. नेहमींहून तीन चार दिवस तिच्या पोटांत दूध देखील कमी गेलें होतें. मग अगोदरच अशक्त प्रकृतीवर इतका परिणाम झाला तर त्यांत काय नवल? पण या वेळीं आईला पुष्कळच बरें वाटत होतें. बबूताई हलके हलके संत्र्याच्या फांकी आईच्या तोंडांत घालीत होती. आणि ती पण घेत होती. आई आम्हां सर्वाकडे क्षीण डोळ्यांनी पण समाधान वृत्तीनें पहात होती. आणि शांत चित्तानें आम्हां सर्वांचीं बोलणीं ऐकत होती ! संत्र्याची एक फांक उचलून बबूताईने आईच्या तोंडाजवळ नेली, आणि आई ती फांक तोंडांत घेत आहे, अशा वेळीं दादा मजकडे वळून म्हणाला, "ताई, हें दृश्य पहा ! एका धनाढ्य ची कन्या, एका अनाथ आईला तिच्या रुग्ण स्थितींत असें अमृतासारखे फळ चाखवीत आहे ! दृश्य किती गोड आहे नाहीं ? या आपल्या शत दरिद्री जागेचें, या मज- सारख्या मजुराच्या वस्तीस्थानाचें, त्याच्या या छोटया कुटुंबाचें, आणि या अशा कुटुंबांत केवळ तुझ्यावरील प्रेमाकरितां मलबार हिलवरील ऐश्वर्य- संपन्न बंगल्यांतून मालकी हक्कानें वावरणाऱ्या बबूताईसारख्या धनिक कन्येने असल्या जागेत बसण्यांत आनंद मानावा. आमच्यांत मिसळण्यांत सुख मानावें ! याचें शब्दचित्र कसें उठवशील सांग बरें ! - बबूताई, आमची ही आजची अजागळ ताई पुढे मोठी लेखिका होणार आहे, तुम्हांला असेलच माहीत ! आणि तेवढ्याचकरितां ती शिकते आहे- म्हणून मी तिला या वेळच्या या स्थितीचें वर्णन करायला सांगितलें !- हं, बोल ताई - कर पाहूं वर्णन ! - धोबीतलावावरील जेरमहालांतल्या तिसऱ्या मजल्यावरील एक अत्यंत लहान- अडचणीच्या कोपऱ्यांतील एक खोली - हं पुढें -"
 पुढे काय ? - पुढचें वर्णन अगोदरच इतका वेळ केलें आहेसच कीं तूं ! तेंच रात्रीं डायरीत लिहून ठेवीन म्हणजे झालें ! " मी म्हटलें.
 "खरेंच, सुगंधाताई, संतुदादाचें आतांचें बोलणें टिपून ठेव ! याच्याइतकें दुसरें चांगलें वर्णन कुणालाच करतां यायचें नाहीं !" बबूताईनें माझ्याच म्हणण्याला पुष्टी दिली.