पान:मजूर.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
मजूर


बोलला नाहीं माझ्या जवळ ! जाऊं दे. झालें तें झालें ! उद्यां कामावर आल्यावर त्याचा कान पकडून विचारतों कीं अशा सोन्यासाख्या बहि- णीची काय देना चालविली आहेस ! नाहींतर चल आतांच तुझ्या बरो- बर घरी येतो. तुझ्या आईची प्रकृती पाहायला मिळेल. बॉय, जा बरें व्हिक्टोरिया घेऊन ये ! तुमचं बिन्हाड कुठे गांवदेवीला का ? - "
 "नाहीं.धोबीतलावावर - जेरमहालांत - तिसऱ्या मजल्यावर ! - दत्ता- साहेबांचे पोटभाडेकरी म्हणून आहोत आम्हीं !" मला इतकें उत्तर द्यावेच लागलें.
 "कांहीं हरकत नाहीं ! माझ्या बरोबर तुला गाडींतून नेतों ! " असें म्हणून स्वारी व्हिक्टोरियाची वाट पहात तोंडाने शीळ फुंकीत ऑफि- साच्या जागेत इकडुन तिकडे येरझाऱ्या घालूं लागली. ही एक ब्यादच झाली ! नाहीं म्हणावं तरी पंचाईत ! होय म्हणावें तरी पंचाईत ! मॅने- जरच्याहातून तसें निसटणें आतां अशक्य होते. त्याच्याच तंत्राने घेतल्याशिवाय सोय नव्हती ! त्याच्या शिव्यांनी दादाच्या किंवा माझ्या अंगाला भोकं पडत नव्हती. बरें वाटेल तें जरी बडबडत होता, तरी दादाचें नांव कळतांच, त्याची भाषा, व आवाज, एकदम बदलला होता, हें माझ्या लक्षांत येऊन चुकलें होतें. दादाबद्दल त्याचे मत पण वाईट दिसलें नाहीं ! त्यामुळे माझा निम्मा जीव खालीं पडला, कांहीं जरी बड- बडला तरी माझ्याशीं फाजीलपणा करण्याची त्याचीं छाती नव्हती, हैं मी इतका वेळच्या त्याच्या बोलण्यावरून, आणि आजपर्यंतच्या दादाच्या सांगण्यावरून ओळखले होतें. तेव्हां त्याच्याच तंत्राने घरापर्यंत त्याच्याच व्हिक्टोरीयांतून जायला माझें अर्धेअधिक मन तयार होत आलें होतें!  "तुझं नांब काय सांगितलेंस ?"
 कांहीं तरीच विचारावयाचें म्हणून मॅनेजरने विचारलें.
 "मी माझें नांव सांगितलेच नाहीं ! - माझ्या भावाचें नांव सांगि- तलें !” मी उत्तरलें.
 "बरें आतां सांग ! - बरीच हुशार आहेस ! - आतां विचारतों, आतां सांग ! – ”
 "सुगंधा माझें नांव ! - "