पान:मजूर.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
मजूर


रजा द्या आणि आम्हांला घरी जाऊं द्या कसे ?"-
 हैं बोलतांना मी याच्याकडे पाहिलेही नाहीं. दाराच्या बाहेर पाहूं लागलें !-
 "आई अजारी आहे ? "
 "होय ! - "
 अजून मेली नाही काय ?-या मजुरांचे आई, बाप, भाऊ, काके, मामे, बरें नेहमी नेहमी यांच्या रजेच्या सोयीकरितां आळीपाळीने आजारी पडायला तयार होतात ! मजुरांना हा गोतावळा इतका मोठा कसा असतो कोण जाणे ! तरी बेट्यांना खायला प्यायला असत नाहीं ! लव- करच ही नातलग मंडळी मरून तरी जायला पाहिजेत. यांच्यामुळे आम्हांला गिरणी मजुरांना वरचेवर रजा द्यावी लागते- कामाचा घोटाळा होतो - मालकाचे नुकसान होते ! आम्हांला जबाबदार धरतात ! याच्या- पुढें मजूर कामाला ठेवायच्या आधीं त्याच्या गणगोताची पूर्ण चौकशी केली पाहिजे. मजुराला आया किती आहेत, बाप किती, भाऊ किती, बहिणी किती - बाकी हिच्या सारख्या एकदोन बहिणी असल्या तर तो मजुरी करायला येईल कशाला आमच्याकडे म्हणा ! - काय रे बॉय ? तुला किती आईबाप आहेत ? खरें एकदां सांगून टाक. म्हणजे तुला माझ्या जवळ कायम ठेवायचें कीं नाहीं हें मला ठरवितां येईल- फारसे नाहींत ! ना आईबाप तुझ्या रजेकरितां वरचेवर अजारी पडायला ? -बाकी, या मुलचा भाऊ गाढव दिसतो ! मजूरच तो ! त्याला काय अक्कल आहे? अक्कल असती तर असलें हातचें घबाड सोडून गिरणीत हमाली करा- यला कशाला मरायला आला असता !- पोरी, तुला राग येऊ देऊ नकोस. पण तुझा भाऊ बडा गद्धा असला पाहिजे ! – "
 आपण माझ्या भावाला रजा देणार आहांत का ?" मी अगदी रडकुंडीस येऊन विचारलें !
 "अग हो. तुझ्या भावाला रजा द्यायची आहे नाहीं का ? - तुमची आई खरी अजारी असो; नाहीं तर खोटी, तुझ्या सारख्या सुन्दर तरुणीनें खोटी सबब सांगितली तरी ती माझ्या सारख्यानें खरीच मानली पाहिजे! तुझ्या भावाला रजा काय उद्यांगसून पाहिजे ? बिनपगारी सुद्धां चार दिवसापेक्षां जास्त देण्याची वहिवाट नाहीं, आमच्या गिरणीची !”