पान:मजूर.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रें.


मॅनेजर खुशालचंद


 मॅनेजर खुशालचंदांची शरीरयष्टी वेताच्या काठीसारखी किडकिडीत, उंचीने बरीच जवळजवळ सहाफूट. वर्णानें निमगोन्याहून जास्त गौर ! चेहरा चौकोनी, दृष्टी कावळ्याची, चंचलपणा, अधिकारांची हौस दर्श- विणारी ! चोंचीदार नाक ! कान वाजवीपेक्षा लहानच, तोंडाला बेडौल करणारे, स्वारीला मिशा बोडण्यांतच भूषण वाटत असावें असें दिसलें. डोक्यावर साहेबी हॅट घालण्याची आवड दिसली. कारण या वेळी जरी स्वारी बोडकीच होती व वाढलेल्या केसांचा भांग पाडून आपल्या चम- त्कारिक डोक्याचें चमत्कारिक प्रदर्शन करण्यांत गढली होती तरी, समो- रच्या टेबलावर साहेबी टोपी पडलीच होती ! डोळ्यावर फुटका चष्मा चढविला होता ! खरोखरीच दृष्टी साफ नव्हती, की फॅशन म्हणून चष्मा नाकावर चढविला होता, त्याचें त्यांसच माहीत ! कोटपाटलून, बूट - तो सर्व जामानिमा ठाकसेठीक मॅनेजरच्या जागेला शोभण्यासारखाच होता ! लांबलचक खालच्यावरच्या ओठानीं युक्त असे तोंडाचें एंजीन स्टेट एक्सप्रेस - सीगारेटच्या साह्याने धुराचे भपकारे सोडीत होतें ! कपा- ळावर तिरस्काराच्या त्रासाच्या–चढेलपणाच्या आठ्यांनी या वेळीं महत्वाची जणूं काय मिटींगच बोलावली होती ! मग काय नेहमींची स्वारीची सुरतच अशी, कीं आतांच्या वर्तमानपत्राच्या त्रासदायक माहितीनें हैं स्वरूप नटविलें होतें, हे कळणे दुरापास्त होये ! माझा दादा जर या वेळीं इथें असता, आणि तुझ्या मॅनेजरनें असा कां चेहरा केला आहे, म्हणून मी त्याला विचारले असते, तर इंग्लंडात मजुरपक्षाचे पुढारी सर रामसे मॅक्डोनाल्ड मुख्य प्रधान झाले म्हणून या सत्तेच्या कुत्र्याने अशी दीड हात लांब जीभ बाहेर काढली आहे, आणि पोष्टाच्या पेटीसारखें तोंड करून मनांतला त्याविषयींचा तिटकारा सहन होईना म्हणून कर वंदीचें जाळें कपाळावर पसरलें आहे ! आजकाल इंग्लंडांत पार्लमेंटांत