पान:मजूर.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
मजूर

माझ्या हालचालीकडे एकसारखी बारीक पण तीक्ष्ण नजर होतीच. मला शुद्धीवर आणण्याकरितां त्या गृहस्थाने आपल्या मोटार ड्रायव्हरकडून जवळच्या तोटीचें पाणी आणून माझ्या मस्तकावर घातलें होतें. तोंडा- वरही थंड पाण्याचे हबके मारले होते. आणि म्हणूनच मला वाटतें मी शक्य तितक्या लवकर सावध झालें होतें. डोळे उघडले खरें पण क्षणभर मी हतबुद्धच होतें. भी कोठें आहे ? वेळ कोणती आहे ? माझ्या सभों- वतीं हे लोक कां जमले आहेत, त्याचें मला ज्ञानच नव्हते ! माझी अगर्दी दिशाभूल झाली होती. मी डोळे उघडले हें पाहून त्या सद्गृहस्थास जरी बरें वाटलें, तरी तो गृहस्थ एकदम कांहीं बोलला नाहीं. माझी स्मृति हलके हलके येऊं लागली. पूर्वस्थितीवर नंतर यावयाला मला फार वेळ लागला नाहीं. पूर्ण भानावर येतांच मी एकदम जाग्यावरून उठलें ! — अगदीं चमत्कारिक रीतीनें समोरील सद्गृहस्थाकडे पाहिलें, त्या गृहस्थाचा चेहरा निरखून पाहतांच मला अतिशय आश्चर्य वाटलें. तो चेहरा ओळ- खीचासा वाटला. अगदीं खास-खास ओळखीचा परिचयाचा असा वाटला. पण प्रत्यक्ष या गृहस्थाला कधींच आणि कुठेच पाहिल्याचें मला आठवेना ! मी त्याबद्दल माझ्या डोक्याला जितका जितका ताण देऊं लागलें, तितकें तितकें मन अधिकच घोटाळ्यांत पडूं लागलें. मग मी तो नादच सोडून दिला. अगोदर या वेळीं मनाची घडी विसकटलेली होती. त्यांतून दुसरा तिसरा विचार करावयाला डोक्याला फुरसदही नव्हती ! मी उठून उभी राहिलें, आणि चालूं लागणार, तोंच त्या मोटार- गाडीच्या मालकाने माझा तो बेत ओळखून मला थांबविलें; तो म्हणाला:-
 "थांबा बाई, तुम्हीं कुठे जातां आहांत ? "
 खरेंच ! मी कुठे निघालें होतें ? कुठे जाणार म्हणून त्या सद्गृह- स्थाला सांगू ? मी बोलत नाहीं, व जागचीही हलत नाहीं, असें पाहून तोच पुन्हा म्हणाला ः—
 "बाई, तुम्हीं कुणीही असा. मला माझ्या बहिणीसारख्या आहांत ! माझ्यापासून कसलीही भीति बाळनूं नका ! तुम्हीं उन्हांच्या तिरमीरीनें घेरी येऊन पडला होता. मला वाटतें, तुमच्या पोटांत देखील कांहीं नाहीं ! तुम्हीं अशा चालतच कुठे जाणार ? तुमच्या या घेरीनें तुमची