पान:मजूर.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रें.
प्रेमळ नेत्रकटाक्ष.

 संतुरामदादाची गिरणी किती दूर होती कोण जाणें ! धोबीतलावा- वरच्या आमच्या बिन्हाडांतून निघाल्यापासून मी एकसारखी चालत होतें. पोलिसानें सांगितलेल्या सर्व खाणाखुणा संपेपर्यंत कोणाला विचा- रिलें नाहीं, व कोणाला विचारावें लागलें नाहीं. नंतर दुसऱ्या एका पोलिसाला विचारण्याची पाळी आली. पहिल्या पोलिसाइतका हा सीधा दिसला नाहीं. मी दीनवाणीनें, मवाळकीने विचारतांच तो "क्यां?" म्हणून खस्सकन् आंगावरच आला. पण शेवटी त्यानेही मार्ग सांगितला. सुसरी- बाई तुझीच पाठ मऊ ह्मणत ह्याही पोलिसाला आशिर्वाद देत पुढें चाललें. पण चालायचें तरी किती ? पाय अगदीं दमून, थकून गेले. अंगांतून घामाचे पाटच्या पाट चालले होते. श्रम करण्याची, कष्ट सोस- ण्याची पहिल्यापासून मला जरी संवय होती, अगदींच कांहीं ताटावरून पाटावर, नी पाटावरून ताटावर करण्यांत माझा जन्म गेला नव्हता, तरी त्या कष्टाला पण मर्यादा होतीच. त्यांतून सांगण्यासारखी गोष्ट नाहीं, पण या ठिकाणी अंतःकरण उघडें केल्याखेरीज रहावत नाहीं. गेल्या तीन चार दिवसांत मला नी संतुरामदादाला खरोखरच अर्धपोटीं रहावें लागलें होतें. काय करणार ? पगाराची तारीख जवळ आलेली. शिलकी धान्य संपलेलें. वीष घ्यायला देखील दिडकी जवळ नाहीं. कुणाकडे दिshi अधेल्याकरितां तोंड उघडावयाची सोय नव्हती. एकाद्याकडे तोंड वेंगाडलें, आणि मिळविलें, तरी तें परत कशाच्या जिवावर करायचे ? दादाचा जो कांहीं पगार येई, त्यांतच आम्हां चौघांची पोटें, कशीबश भागविल्याशिवाय गत्यंतर नव्हतें ! मग महिन्याचे शेवटचे चार आठ दिवस आम्हां सगळ्यांना अर्धपोटी राहण्याखेरीज काय उपाय होता ? त्या अर्धपोटी उपाशीपणामुळे मला फारच लवकर थकवा आला. पाय इलेनात. डोळ्यापुढे हिरवीपिवळीं चक्रे दिसायला लागली. मुंबईतल्या