पान:मजूर.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मजूर


वेळ आली. बिन्हाडाच्या बाहेर पडतांच प्रथम मनांत आलें कीं, तडक आपल्या वासंतीच्या मैत्रिणीच्या बंगल्यावर जावें, तिला किंवा तिच्या घरांतील पुरुष मंडळींकडून गिरणीची माहिती विचारावी, नी मग गिरणीकडे जावें. पण पुन्हां वाटलें, “दुसऱ्याला, एवढ्या तेवढ्या करितां कशाला त्रास ' पुन्हां तितका वेळ तरी कुठे आहे ? त्या पेक्षां सरळ मार्ग म्हणजे स्टँडवरच्या पोलिसाला विचारावं, आणि असेंच वरचेवर विचारीत जावें. ट्रॅमने जातां आलें असतें. कदाचित् लवकर जातां येऊन कमी त्रासांत व कमी वेळांत जातां आलें असते; पण ट्रॅमला जातां येतां दोन आणे खर्च करण्यासही शक्य नव्हतें. अगोदर आज दोन आणे देखील नव्हते. आज संतुरामदादाचा पगार येईल तेव्हां घरी पैसा दिसाव याचा ! तोही तास अर्ध्यातासापेक्षां जास्त नाहीं. कारण तितक्या वेळांत गेल्या महिन्यांत केलेल्या उधाऱ्या, घरभाडें, किरकोळ देणीं, सामानाची बिलें, इत्यादि भागवायाची असायचीं ! तीं सर्व भागवून रुपया आठ आणे हातांत उरलेच तर नशीब समजावयाचें ! अगदीं देव पावला, असें वाटावयाचे ! मजुरांच्या नशीबी पैशाच्या सहवासाचा आनंद यापेक्षां जास्त वेळ कुठून येणार? - असो. सांगावयाचें कारण काय ? तर दोन आणे ट्रॅमला देण्यापेक्षां तेच दोन आणे आईला सोड्याची वगैरे बाटली आणल्यास उपयोगी पडले तर तें मला पाहिजे होतें. म्हणून मी ट्रॅमचा विचारही मनांत आणला नाहीं. तशीच विचारीत विचारीत जाव- याचें ठरवून मी चालूं लागलें. मनांत देवाचा धांवा एकसारखा चाल- विला होता. उन्हाळ्यांतलें मुंबईचें ऊन्ह ! डोक्याला आणि पायाला सार- खेच चटके देत होतें ! पण छत्री, किंवा पादत्राण घेण्याची आमची ऐपत नव्हती ! मजुरांच्या जगांत आमचा जन्म झाला होता. त्या आम्हांला शरीराच्या सुखार्ची साधनें मिळालीं नाहींत, तर त्यासाठीं कुरकुर कुणा- जवळ करावयाची ? कां करावयाची ? तळपाय आणि मस्तक करपत होतें, तर आईच्या शेवटच्या स्थितीचें चित्र त्याहूनही आंत आगीचा भडका उडवत होतें ! आतबाहेरचा हा भडका कळण्याइतकेंच नव्हे, तर सोसण्याइतकें माझें वय व ज्ञानही होतें ! मला या बाह्य चटक्याचें कांहीं वाटत नव्हतें. छत्री किंवा पादत्राण नाहीं, याबदल दुःख होत