पान:मजूर.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मजूर

 "आई, अशी घाबरूं नकोस. तूंच अशी धीर सोडूं नकोस ! तुला किनई बरें वाटेल, डॉक्टरला आणूं का जाऊन !" असें म्हणून डॉक्टरला हांक मारण्याकरितां मी अर्धवट उठलें देखील. पण आईनें तसेंच बसविलें.
 " आतां डॉक्टर कशाला ? नी डॉक्टराला आणून त्यांना द्यायचे काय ? वेडी तर नाहींस तूं ? गरिबाला का कुठें डॉक्टर असतात ? शिवाय हें पाहिलेंस का ? माझे पाय गार पडत चालले आहेत. माझें मरण मला स्पष्ट दिसूं लागलें आहे. नी आतां डॉक्टर कशाला ? बाळ, अशी घाबरू नकोस ! धीर सोडूं नकोस. तूं माझी मुलगी आहेस. तुला असा धरि सोडणें शोभत नाहीं ! शिवाय तूं शिकलेली आहेस, शिक- लेल्या माणसाला विचार करतां येतो ना ? आल्या प्रसंगाला तोंड द्यायला शिकावयाला नको का ? - "
 आई हैं कितीतरी आणि एकदम वोलली. पाण्याच्या दोन घोटांनी तिला इतकें अवसान आलें होतें. त्या अवसानांत तिला जितकें बोलतां आलें, तितकें ती बोलली. नंतर बरीच जोराची तिला ग्लानी आली !, या वेळी माझा धीर सुटला. क्षणार्धात मला सारें ब्रह्मांड आठवलें. पांच वर्षांपूर्वी आमचे बाबा सोडून आह्मांला गेले. आज आई सोडून चालली. बाबांच्या दुःखाचा विसर किंचित् पडतो आहे तोच पुन्हां हें परमे- श्वर आमच्यापुढे काय वाढून ठेवतो आहे ! थोडा वेळपर्यंत मी अगदीं गलित गात्र झालें ! मला कांहींच सुचेना. पण असें म्हणून कसें चालणार ? - गिरणीत जाऊन संतुरामाला बोलावून आणणें तितकेंच आव- श्यक होतें. मी झटकन् अवसान धरून उठलें. रत्नु जवळ जाऊन त्याच्या तोंडावरून हात फिरविला. त्याचा मुका घेतला. आणि मी त्याला सांगितलें,
 रत्नु मी इतक्यांत आपल्या दादाला घेऊन येतें, तंवर आई जवळून हलूं नको हं ! इथंच बसून खेळ बरें का ? "
 हे सांगताना, व त्याचा मुका घेतांना माझे डोळे फिरून पाण्यानें भरून आले होते. मला जरा वेळ इकडचे तिकडचे देखील दिसेना ! माझ्या डोळ्यांतले पाणी पाहून रत्नु गडबडला. त्यानें माझ्या गळ्याला मिठी घातली. "ताई, तूं कां ग रडतेस ? मी आज तुझ्यावर रागावलों