पान:मजूर.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
मजूर

 दुःखांत सुख इतकेंच होतें म्हणावयाचें कीं, 'शेटजीं'च्या खुनाबद्दल वर्तमानपत्रांत काय येत असेल तें येवो, सरकारी चौकशी कांहीं झाली असो, प्रत्यक्ष वस्तुस्थिति कितीही संशयास्पद असो, पण दादाबद्दल बबूताई आणि भाई, यांना शंका नव्हती. त्यांना तरी वाटत नव्हतें ! ते दादा- बद्दल अजून सहानुभूतीच दर्शवीत होते, इतकेंच नव्हे, तर भाईनें बबू- ताईच्या सम्मतीनें व सल्ल्यानें दादाच्या बचावाची उलट जारीनें खटपट चालविली होती. दादाला जामिनावर सोडण्याची खटपट करून पाहिली होती ! दाहासाठी बॅरिस्टर बी. सदाशिव देखील नेमला होता !
 दादा कच्च्या तुरुंगांत कोणत्या मानसिक स्थितींत कोणजाणें दिवस कंठीत होता.
 भाईची व बबूताईची कोण अवघड मनाची परिस्थिति ! प्रत्यक्ष वाड- लांचा खून झालेला ! सगळ्या ग्राह्य पुराव्यावरून दादावर 'खुना'चा आरोप शाबीत होण्सारखा ! दादाला पकडलेला ! सगळ्या जगाची समजूत हीच ! गिरणीवाल्याचें जग आणि दुःखांत समाधान 'खुनी' सांपडला यांतच मानीत होतें ! पण भाई आणि बबूताईला दादाबद्दल सहानुभूतीच होती! दादाच्या हातून खून झालाच नाहीं अशी खात्री दोघांचीही होती. आणि दादा सरकारी यंत्रांतून दोषमुक्त होऊन उजळ माथ्यानें सुटावा अशी त्यांची इच्छा होती. त्याकरितां पदरचे पैसे खर्चून प्रयत्नही त्यांनी चालविला होता ! खन्याखुऱ्या थोर अंतःकरणाशिवाय असे कुणाच्या हातून घडणार !
 या परस्पर विरोधी जगाच्या एकाच वेळच्या घडामोडीबद्दल काय समजावें ? याबद्दल आमचीं मनें पूर्णपणे अज्ञानावस्थेत वावरत होती. मला तर हरघडी वाटत होतें - आमचें सर्वस्व संपलें ! आम्हीं जगांतून उठलों !
 आला दिवस जात होता ! आम्हांला जगण्यांत अर्थच वाटत नव्हता ! मी का भूभार जगलें आहें ? असा माझा मलाच राग येत होता ! पण मरेपर्यंत जगायलाच पाहिजे. मग तें कसेंही जगणें असले तरी पत्करलें पाहिजेच ! त्याला उपाय काय ?
 मन चिंती ते वैरी न चिंती ! आम्हांला जे वाटावयाला नको, असें