पान:मजूर.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वें
तुरुंगांत भेट.

 मी दोन दिवस ताईकडेच राहिलें होतें ! आम्हीं एका दृष्टीनें सम दुःखी होतों ! रडून रडून आम्हीं आतां दमलों होतों. डोळ्यांतले पाणीच संपलें होतें ! काळीज करपून गेलें होतें. आमच्यावर संकटांची परमावधी झाली होती. आमची मैत्री ताईला घातक झाली, असें आमच्या मनांत येऊन आम्ही आपल्या हतदैवाला दोष लावीत होतों. तरी " ताईची मैत्री आम्हांला या स्थितीला कारण झाली ! या कल्पनेनें ताईच्या जिवाला विचारांचे विंचू डसत होते ! आमच्या दारुण करुणाजनक स्थितीपुढें, ताईला आपले दुःख फिके वाटत होतें !
 उजाडला दिवस मावळत होता- ' दादाला ' फांशीची शिक्षा होणार, हेंच आपले आमच्या मनाने घेतलेलें ! आतां मी आणि रत्नु -! जगांत दोघेंच उरलों होतों ! कुठे जायचें ? कुठे उभे राह्यचे ? कुणाच्या तोंडा- कडे पाह्यचें ! कोण आम्हांला जवळ येऊ देणार ? खुनी भावाची भांवडे म्हणून जो-तो तिरस्कार करणार, दूर पळणार ! भिक्षा सुद्धां कुणी घालायला पुढे यावयाचें नाहीं ! कसे दिवस काढायचे ? जगायचें कसें ! मरायचे तरी कसें ?
 होतें करें ? झालें कसें ? कल्पना करीत होतों काय ? कोणत्या आशेनें हालांत, कष्टांत, सुखासमाधानानें रहात होतों, डोळ्यांतल्या पाण्याबरोबर शिळ्या भाकरीचा घांस गोड करून खात होतों-चिंतीत होतों काय ? आणि हें पुढें दैवानें वाढून ठेवलें काय ?
 कोणत्या जन्माचीं पापें उभीं राहिलों १ कीं त्यामुळे जन्मांत प्रत्येक गोष्ट सत्याला स्मरून, देवाला भिऊन, सज्जांनाना संतोष होईल, अशी करीत असतांना, त्याचा परिणाम असा व्हावा ?
 हेच आणि असलेंच विचार एकसारखे मनांत येत होते ! बबूताई मला सांगत होती, मी बबूताईला सांगत होतें !