पान:मजूर.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मजूर

नव्हता! त्या पाहण्यांत रोजच्यासारखा स्थीरपणा नव्हता ! माझ्या तर काळजानें ठाव सोडला. मला कांहींच सुचेना. कांहीं तरी बोलावे वाटे, पण तोंडांतून शब्दच उमटेना. आपली वेड्यासारखी आईच्या तोंडाकडे. पहात राहिलें. आईच्या कांहींशा हेतूशून्य नजरेकडे पाहून कां कोण जाणे- मला रडूं कोसळण्याच्या बेताला आलें. माझ्याच्याने आतां राहवेना. आईशीं लगटून बसलें. तिच्या मानेला हाताचा विळखा घातला. आणि अगदीं रुद्धकंठानें विचारलें.
 " आई ! – आई ! – ” पुढे माझ्यानें बोलवेच ना ! पण माझी ही स्थिति या वेळीं आईच्या ध्यानांतच आली नाहीं. किंवा माझी स्थिति लक्षांत येण्यासारखी आईच्या मनाची स्थिति नव्हती म्हटलें तरी चालेल. ' आईची अखेर वेळ ' तर आली नसेल ? असें मनांत येण्याबरोबर डोळ्यापुढें चक्करच आली ! क्षणभर मी डोळे मिटून तशीच पडून राहिलें. सावध झाल्यावर दूर सरलें. न जाणों, माझ्या अंतःकरणानें ठाव सोडला आहे, हें समजतांच, आईला अधिकच यातना होतील. अंतकाळी आईच्या आत्मारामाला अधिकच क्लेश होतील. माझ्या डोळ्यांत पाणी पाहिले तर रत्नुही मोठ्याने रडायला लागेल. म्हणून निमूटपणें मी आंतल्या आंत रडें आवरलें. आईच्या आणि आई च्यापेक्षां माझ्याच मनाला थोडासा विरंगुळा वाटावा म्हणून एकादें श्रीरामावरचें गाणें म्हणावें असें मनांत आलें " गाणें म्हणूं का," म्हणून मी आईला विचारणार तोच, आईनें हांक मारली-
 " सुगंधा – ”
 " आई, मी इथेंच आहे ! "
 बाळ, आज तारीख किती ?
 " पांच तारीख आई ! "
 "अन् वार ? "
"गुरुवार !"  "वाजले असतील किती बरें ? "
 "एक वाजून नुकताच गेला आहे ! "