पान:मजूर.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
मजूर

सडकेच्या बाहेर कुणी चाकरांनी डोकावून पाहिलें ! रस्त्याला कोणीही फारसे दिसले नाही !
 बंगल्यांत एकच हाः हाः कार उडाला ! शेटजींच्या पाठीत तीन-चार पिस्तुलाच्या गोळ्या घुसल्या होत्या. खादीचा सदरा फाटून पाठींतून भळभळा रक्त चाललें होतें ! !
 प्रेमचंदभाईनें झटपट भानावर येतांच टेलिफोन जवळ जाऊन पोलिस स्टेशनवर टेलिफोन दिला !" Help! Murder ! help ! at once t Bungalow, No ! x x x ”
 " संतूराम, आपण अजून इथेंच होतां ? किती ? एक वाजलाका १ काय कसें झालें ? कुणी कुठून बाबांच्यावर गोळ्या झाडल्या ? पाहिलेत का तुम्हीं ? ओळखले का कोण होते ते तुम्हीं ? " भाईनें दादाला विचारलें ! दादा बापडा काय बोलणार ? त्यांच्या इतकाच तोही या अघटित, अमानुष, अकल्पित प्रकाराबद्दल अनभिज्ञ होता ! त्याला कांहीं बोलताच येईना ! तो भानावरही किती तरी वेळ नव्हता ! तो झोपेत कीं जागृतींत होता, मुंबईस की बाहेर ठिकाणीं होता, याबद्दलही त्याची विचारशक्ति नष्ट झाली होती !
 खुनी बदमाषाला शोधण्यासाठीं नौकरचाकरांनी बंगल्यांतील प्रत्येक कोपरान् कोपरा धांडोळला ! कोणी कुठेही आढळलें नाहीं ! ! बंगल्यांत, आंतबाहेर, प्रत्येक ठिकाणी भरपूर विद्युद्दीप होतें, त्यामुळे कोणालाही दडून लपून-छपून बसावयाला संधि सवड नव्हतीच !
 भाईनें खिडकींतून बाहेर पाहिलें तों आपल्या बंगल्यांत कसला तरी आवाज झालेला पाहून कांहीं गरीब दरिद्री लोक, सडकेवर फिरत होते, ते कावरेबावरे होऊन चटकन् पावले उचलून शक्य तितकें दूर जाण्याच्या धांदलीत दिसले !!
 बबूताईला रडता भुई थोडी झाली ! भाईलाही रडूं कोसळलें ! ! कोण हा चमत्कारिक प्रसंग ! बबूताई, भाईसारख्या सालस, प्रेमळ, उदार, सुखी, देवमाणसावर - निरपराध माणसावर केवढा घोर- प्रसंग ! केवढा दुःखाचा आकस्मिक डोंगर कोसळला होता हा !