पान:मजूर.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
मजूर

येऊ देऊ नये, हे मजुरांचें दुर्दैव तर खरेंच ! पण गिरणीवाल्यांनाही तें हितावह - सुखावह नाहीं ! हें मात्र कोणालाही सांगतां येईल !! "
 " अगदीं बरोबर, अगदी बरोबर ! संतूराम तुमच्या बोलण्यानें मला फार समाधान वाटलें. आपली 'मुलाखत ' माझ्या अपेक्षेहूनही जास्त सुखदायक आणि परिणामकारक झाली ! आतां मी तुम्हांलां सांगतों :- "गिरणीवाल्यांनी आपल्या अर्जाचा विचार तूर्तास तरी फारच चांगला केला आहे. बोनस, आणि पगार वाढ, या मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत ! आजपासून तीन दिवसांनी- बहुतेक येत्या सोमवारीच त्या जाहिर होतील. मजुरांनी यावेळीं हें मान्य करून कामाला यायला पाहिजे ! आणि कांहीं काल नंतर अशाच शिस्तीनें आपल्या मागण्यापुढे केल्या पाहिजेत ! म्हणजे सर्वांचंच हित ज्यांत आहे, अशा गोष्टी होत राहातील ! अशी तुम्हांला मी आतां आनंदाची बातमी सांगतों ! "
 हातीं घेतलेल्या कामांत यश आलें, हें ऐकून दादाच्या नेत्रांत समा- धानाचे सात्विक अश्रू चमकले !