पान:भूमी आणि स्त्री.pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोकसंस्कृतीची क्षितिजे दिगंतालाही व्यापून उरली आहेत. पाताळाच्याही पल्याड तिची मुळे पोहोचली आहेत. लोकसाहित्य ही प्रवाही घटना आहे. अबोध समूहमनाच्या (Collective Unconscious) प्रेरणेतून लोकसाहित्य आकाराला येत असते. आदिम काळापासून समूहमनाचे संचित व्यक्त करणाऱ्या काही संकल्पना त्यातून दृगोचर होत असतात. त्यांनाच आपण आदिबंध (Archytype) म्हणतो. या आदिबंधाचे आविष्करण, कालप्रवाहाचे झोत सातत्याने अंगावर घेत सतेज राहणाऱ्या, शेकडो...हजारो वर्षांपासून चालत आलेल्या लोकपरंपरांतून, शिल्प, चित्र, संगीत आदिकलांतून, लोकसाहित्यातून होत असते.
 सर्वसामान्य माणसाच्या भावविश्वाला सतत चेतना देणाऱ्या अनेक गोष्टी संकल्पना, श्रद्धा, परंपरा, रूढी, दैवतकल्पना, विधी, भाषा, उपासना पद्धती आदी माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. त्यालाच आपण लोकसंस्कृती म्हणतो. ती सांगता येत नाही. दाखविता येत नाही. अशरीरिणी संस्कृती, विधी, उत्सव, व्रते, सण, तत्संबंधी गीते, शिल्प, चित्र, नृत्य, संगीतादी कला यांच्या आविष्करणातून साक्षात् होत असते.
 खेड्यातील सामान्य माणसाच्या भावविश्वाचे दर्शन तसेच त्याची मातीवरील श्रद्धा पाहून लक्षात आले की, भाषा बदलली, प्रान्त बदलला, पोषाख बदलला, पदार्थांची चव बदलली तरी भारतीय माणसाच्या भूमीवरील श्रद्धा सारख्याच असतात. ज्या विधी, उत्सवांमधून त्या व्यक्त होतात, त्यांच्या भावाविष्कारातही

भूमी आणि स्त्री