१९८७ साली एम.फिल. च्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंचेचाळिशी ओलांडल्यावर पुन्हा एकदा 'प्रत्यक्ष विद्यार्थी' होण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळी मनाचा बंद कप्पा उघडला गेला. 'लोकसाहित्य या विषयाचा विशेष अभ्यास करण्याचे ठरवले स्वयंभू संशोधक आणि मनाने शिक्षक असलेल्या प्रा. डॉ. प्रभाकर मांडेंसारखे गुरू लाभले. 'भोंडला भुलाबाई' च्या गाण्यांवर एम.फिल. केले. त्यावेळी असे लक्षात आले की भूमीच्या सर्जनाशी जोडलेल्या उत्सवांत स्त्री-प्रधानता आहे. या सणात कुमारिकांना विशेष स्थान आहे. ही व्रते, हे उत्सव, तत्संबंधी विधी, लौकिक 'धर्म' संकल्पनेशी जोडलेले नाहीत. लोकधारणांशी त्यांचे नाते आहे. या बाबींचा शोध घ्यावा या हेतूने प्रस्तुत विषयाची निवड केली. या शोधनासाठी प्रा. डॉ. प्रभाकर मांडे सरांकडेच नाव नोंदविले. एकूण विषयाचा फलक खूपच विस्तृत होता. विषयाचे सर्वांगीण रूप समजून घेण्याची जिज्ञासा असल्याने आणि कॉलेज घर वगैरेचा व्याप यांमुळे हा शोधप्रबंध पूर्ण करण्यास परिश्रम घ्यावे लागले.
प्रत्येक क्षणी साथ देणारा साथी, त्याचा शेकडो खेड्यांशी - ग्रामीण जनतेशी असलेला संपर्क त्यातून सतत मिळत राहिलेले लोकज्ञान आणि शिष्याला सतत चेतना आणि प्रेरणा देणारे गुरू , या सर्वांच्या सहयोगातून हे स्वप्न जमिनीवर पाय टेकू शकले. गेल्या सात आठ वर्षांपासून केलेला प्रयत्न या ग्रंथाच्या रूपाने सर्वांसमोर ठेवीत आह.
- शैला लोहिया
'किनारा'
३२, विद्याकुंज वसाहत,
अंबेजोगाई - ४३१५१७.
दूरभाष : (०२४४६) ४७०१६
फॅक्स : ०२४४६-४७४९७