पान:भूमी आणि स्त्री.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साम्य आहे. राजस्थानातील गणगौर, कर्नाटक, महाराष्ट्रातील चैत्रगौर यांच्या विधीत 'तृतीये' ला महत्त्व असते. राजस्थानातील तीज, महाराष्ट्रातील हरतालिका किंवा आंध्रातील अटलतद्दी ही कुमारिकाव्रते भाद्रपद तृतीयेस साजरी होतात. महाराष्ट्र, कर्नाटकातला पाडवा वा आंध्रातला 'उगादी' असो, साजरा करण्याचा दिवस चैत्रप्रतिपदेचा. नव्या वर्षाची सुरुवात शेतीच्या संदर्भातील नवे निर्णय...त्यांची सुरुवात याच दिवशी सुरू होते.
 एम.फिल.साठीच्या शोधनिबंधाचा अभ्यास करताना लक्षात आले. महाराष्ट्रातील विविध खेळल्या जाणाऱ्या हादगा, भोंडला, भुलाबाई, भराडीगौर, इनाई या कुमारिकांच्या खेळोत्सवात आणि त्यांच्या गाण्यात मूलभूत साम्य आहे. अशा प्रकारचे कुमारिकांचे खेळोत्सव आषाढ ते आश्विन या काळात इतर प्रांतांत खेळले जातात. आषाढ - गुल्लवा - कर्नाटक, भाद्रपद, आश्विन - सांझी, मामुलिया - मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, भाद्रपद : आश्विन-बदकम्मा-आंध्र ,आश्विन-गरबारास-गुजरात. या आणि महाराष्ट्रातील खेळोत्सवांत, त्यांच्या मांडणीत साम्य आहे. हे खेळोत्सव कुमारिकांचे असून त्यात गाणे आणि प्रसाद यांना महत्त्व असते. या सर्वांगीण एकात्मतेमागचे मूलतत्त्व शोधण्याची भूमिका या शोध प्रबंधामागे आहे.
 अशा प्रकारचा अभ्यास विस्तारपूर्वक आणि सखोलपणे करण्यासाठी 'लोकांच्यात' जाणे, त्यांच्यातील होऊन राहणे; त्यांच्या मनात विश्वास निर्माण करीत त्याच्याजवळ जे 'लोकधन' आहे ते गोळा करणे, आवश्यक होते ते केले. त्यासाठी मानवलोक, मनस्विनी, जनार्थ आदी ग्रामीण भागात काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थांची मदत झाली. नागपंचमीची माहिती गोळा करीत असताना भावठाणा परिसरातील डोंगरात राहणाऱ्या मोरफळीच्या राणूबाई, सुमनबाई कापसे यांनी सांगितले की नागपंचमीचा आदला दिवस, नागपंचमी आणि नंतरचा दिवस ज्याला पंचमीची कर म्हणतात, या तीन दिवशी जमीन नांगरायची, वखरायची नसते. जमिनीला कुदळ लावीत नाहीत. पेरीत नाहीत. स्त्रीप्रमाणे भूमी रजस्वला होते आणि त्यानंतरच तिच्यात सर्जनशक्ती येते. ती सुफल होऊ सकते. हा कल्पनाबंध भारतभर प्रस्तुत आहे. आसाम बंगालातील 'अंबुवाची', केरळातील 'उछारल', काश्मीरमधील 'राज्ञीस्नापन' हे विधिउत्सव या 'कल्पनाबंधा'तून

भूमी आणि स्त्री