पान:भूमी आणि स्त्री.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाच्या चौकटीत ती माणसे भलेही महार, मांग असतील पण ती माणेसच ना? तर त्याने सहभोजन केले म्हणून आपल्या घरी तुझ्या आजीचे श्राद्ध करण्याचे भटजींनी नाकारले.आणि त्या क्षणापासून माझा देव ब्राह्मण, कर्मकांड या सर्वांवरचा विश्वास पूर्णपणे उडाला. आधी फारसा नव्हताच, अम्मा , खरे शिक्षण मनात प्रश्न निर्माण करते. ते प्रश्न मनाला खरवडतात. पण सर्व सोडून देण्याचे धाडस त्या दिवशी आले. आपल्या घरातील श्राद्ध त्या दिवसापासून मी बंद करून टाकले. "सणाच्या निमित्ताने चवदार खाण्याची संधी ती का सोडायची ? तुझ्या आईनेही कधी देवघराविषयी विचारले नाही. घरचे देव तुझी मोठी काकू सांभाळते. तुला मांडायचे का देवघर ? आता बाजारात जाऊन चार देव आणून देतो ! जाऊ?"
 माझ्या मनातले सारे प्रश्न संपले होते. भाद्रपदातील माझी भुलाबाई मांडायला ते मदत करीत. त्यांच्या खोलीतच ती मांडली जाई. रोज सकाळी प्रश्न विचारीत 'हं मग आज खाऊ कोणता ? काय आणू बाजारातून ? कणसं आणू की लाल भोपळा ?' आई काय ते समजे आणि कुणालाही ओळखता येणार नाही असा खाऊ, प्रसाद करी.
 मुलाबाळांना दीर्घायुष्य देणारी जिवतीची पूजा, सद्बुद्धी देणाऱ्या बुध बृहस्पतीची पूजा, शेताचे रक्षण करणान्या आणि बहिणीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नागोबाची पूजा श्रावणात आई आठवणीने करी. देवघर नसलेल्या घरात जिवतीचा कागद भिंतीला आदराने,श्रद्धेने चिटकवला जाई. श्रावणातल्या शुक्रवारो पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून घरात धुणीभांडी करणाऱ्या विठामावशीला रांगोळी घालून ताट सजवून सवाष्ण म्हणून जेवायला घातले जाई. अशा या संगमेश्वरी घरात मी वाढले. तेव्हापासून मनात 'लोक' या शब्दाबद्दलची आत्मीय श्रद्धा रुजली. 'लोक' म्हणजे बाहेरचे असे कधी वाटलेच नाही. घरी येणाऱ्यांत पू. साने गुरूजी, एकेकदाच..... पण घरी आलेले, जवळून न्याहाळता आलेले लोकनायक जयप्रकाशजी, डॉ. राम मनोहर लोहियाजी. एसेम आणि ना.ग. गोरे जणु आमच्याच घरातले. कळू लागले तेव्हापासून या सर्वांचे साहित्य हाती आले. भारतीय संस्कृती, ललितलेणी आणि श्रवणबेळगोळच्या उभ्या डोंगरात बाहुबली स्वप्न कोरून काढणारा ना. ग. गोऱ्यांचा आरिशिनेमी यांनी मनाला संपृक्त केले. नवी दिशा दिली.

भूमी आणि स्त्री