पान:भूमी आणि स्त्री.pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'जादू ही धर्माची प्राथमिक अवस्था आहे.' तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, 'जादू धर्म, विज्ञान यांचे पौर्वापर्य वा साम्य वैषम्य याबाबत पंडीतांत मतभेद असले तरी त्यांची मुळे एकत्रित आढळतात."
 स्त्री ऋतुस्नात झाल्याशिवाय गर्भधारण करण्यास योग्य होऊ शकत नाही तद्वत ग्रीष्म ऋतूत शुष्क झालेली धरणी अंतर्यामी ओलावल्याशिवाय,आर्द्रा झाल्याशिवाय नवसृष्टीचा गर्भ वाहण्यास सक्षम बनत नाही. अशी श्रद्धा आदिमानव समूहात होती. गर्भधारणेपूर्वी स्त्री रजस्वला होते तशीच धरणीही रजस्वला होते अशी आदिमानवाची धारणा होती.
 अंबुवाची उत्सवः पृथ्वीची रजस्वला अवस्था -
 कृषिपराशर या कृषिशास्त्रीय ग्रंथात (रचनाकार सुमारे इ.स. ६ ते ८ वे शतक) पृथ्वीच्या रजस्वला अवस्थेचा काळ आणि त्या काळात वर्ज्य क्रिया यांचा उल्लेख आहे. स्त्रीच्या रजस्वला अवस्थेत पुरुष समागम वर्ज्य मानला आहे. तसेच पृथ्वीच्या रजस्वला अवस्थेत नांगर चालविणे वर्ज्य मानले आहे. नांगर हे पुरुष जननेंद्रियाचे प्रतीक मानलेले आहे. आसामात आषाढ महिन्यात अमती हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सामान्यतः प्रतिवर्षी मृगशीर्ष नक्षत्राचा चतुर्थ चरण आणि आर्द्रा नक्षत्राचा प्रथण चरण या तुफान वृष्टीच्या काळात कामाख्या ही रजस्वला आहे असे मानले जाते. कामाख्या पीठ भारतातील महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. येथे सतीची योनी गळून पडली अशी कथा आहे. ही देवी योनीरूप आहे. प्रतिवर्षी आषाढ शुक्ल ६ अथवा ७ पासून १० अथवा ११ पर्यंत अंबुवाचीचा काळ मानला जातो. या काळात आसामातील काही ठिकाणी मातीच्या घटात धान्यबीज आणि पाणी घालून ठेवतात. अंबुवाचीचा काळ संपताच बीजांकुरानी भरलेला घट नदीच्या प्रवाहात सोडून देतात. काश्मिरात हा काळ फाल्गुन पंचमी ते अष्टमी मानला जातो. यास राज्ञीस्नापन म्हणतात. माळवा गुजरातेत तसेच महाराष्ट्रातील काही भागांत राणूबाई रांदल देवी या सूर्यपत्नीची पूजा केली जाते. चैत्रकृष्ण अष्टमी ते पंचमी हा काळ या व्रताचा असतो. महाराष्ट्रात जेथे भातशेती होते तेथे लावणीपूर्वी 'सात' नावाचा विधी केला जातो. नागपंचमीच्या काळातील तीन दिवस शेत नांगरीत वा उकरीत नाहीत असा रिवाज आहे. केरळात उछारल या उत्सवाची माहिती श्री पद्मनाभ मेनन यांनी केरळच्या इतिहासावरील ग्रंथात दिली आहे.

६४
भूमी आणि स्त्री