Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संकटनिर्मितीसाठीच केली आहे. मनूनेही गणरायाची निंदा केली होती. स्मृतिकारांनी केलेल्या निंदेवरून देवी प्रशाद चटोपाध्याय आदी विद्वान असे अनुमान काढतात की, गणपतीचा संबंध लोकायतिकांशी असावा. कात्यायनाने असे म्हटले आहे की, गणेशयाग हा समाजातील स्त्री व पुरुषांनी एकत्र येऊन करावयाचा विधी आहे. सर्व वैदिक स्मृतिकारांची भूमिका पाहता गणपतीला विघ्नेश, विघ्नराज ही नावे मिळाली हे लक्षात येते. गणपती 'एक दंत' आहे. ब्रह्मवैवर्तक पुराणात परशुरामाने गणपतीवर परशू फेकून त्याचा दात तोडल्याचा उल्लेख केला आहे. परशुराम हा वैदिकमताचा कडवा पुरस्कर्ता होता. क्षत्रियांचा त्याने अनेकदा संहार केला होता. बौद्ध, हिंदूशिल्पातही गणेशाचे स्थान खूप खालचे होते. मात्र इसवीसनाच्या पाचव्या शतकात.... ..गुप्तकाळात त्याच्या स्थानाचे उन्नयन झाले. विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता तसेच सिद्धीविनायक झाला. तो गजमुख आणि मूषक हे वाहन असलेला झाला.
 गणसमाज : समूह जीवनाचा पाठ -
 पूर्वीचा समाज गणसत्ताक होता. प्रत्येक गणाचे एक कुललक्षण चिन्ह असे. ही कुललक्षण चिन्हे गज, नाग, वृषभ, मूषक, श्वान अशी असत. तसे पुरावे शिलालेखांतून मिळतात. स्मृतिकारांनी गणविरोधी भूमिका घेतली असली तरी वैदिक ऋषी स्वतः गणप्रधान समाजातले होते. त्यांनी गणपतीला विघ्नकर्ता वा विघ्नहर्ता मानले नाही. त्यांच्या दृष्टीने तो गणसमाजाचा नायक म्हणून वंदनीय आहे. मात्र त्यांना गजमुखी गणपती अज्ञात आहे.
 गणसमाज सामूहिक जीवन जगत असे. अन्नाचे उत्पादन, विभाजन सामूहिक रूपात केले जाई. समता आणि सामूहिक जीवन ही गणसमाजाची वैशिष्ट्ये होती. श्री. भांडारकर यांच्या मते गणकल्पना आर्यपूर्वांकडून आली आहे. हेच मत श्री. सेन, श्री. मित्र यांनी मांडले. डॉ. स. रा. गाडगीळ लिहितात की, 'ऋग्वेदाप्रमाणे अन्य ग्रंथातही गणसमाजाची स्मृती आढळते. प्राचीन वैदिक ऋषी ज्या समाजव्यवस्थेत राहत, ज्या समाजव्यवस्थेतील समता आणि सामूहिकतेमुळे त्यांच्या जीवनाला संपन्नता लाभली होती. त्या गणसमाजव्यवस्थेचा त्यांनी गौरव केला तर त्यात नवल नाही.'
 वैदिक वाङ्मयात व्रात म्हणजे गण. विशिष्ट सामाजिक संबंधांनी घटित असा समूह म्हणजे व्रात किंवा गण. गणसमाज हा अत्यंत संघटित आणि एकात्मतेने

भूमी आणि स्त्री
५१