सामूहिक जीवन जगणारा होता. त्या काळात व्यक्तिगत मालकीची प्रथा नव्हती. स्मृतिकाळात या दोन शब्दांना चुकीचे अर्थ जोडले गेले. लोकपरंपरांचे पालन करणारा, उपनयन न झालेला तो व्रात असा अर्थ घेतला जाऊ लागला. आजही व्रात्य या शब्दाच्या अर्थावरून तसा संकेत मिळतो.
गणसमाज आणि लोकसत्तेचा अंत : राजसत्तेस प्रारंभ -
गुप्तकाळापासून लोकसत्ता हळूहळू नाहीशी होऊ लागली. परकीय आक्रमण थोपवण्यासाठी कौटिल्याने लहान लहान गणराज्यांना एकत्र आणून एक महासत्ता निर्माण केली. त्या महासत्तेचा शासक म्हणून चंद्रगुप्तास घडविले. या काळापासून गणसत्तेतील संघबळ उत्तरोत्तर लयाला गेले. गणजीवी समाज शेती आणि सैनिक या व्यवसायात गुंतला. स्वयंपूर्ण गाव हे 'एकक' झाले. कृषिनिर्भर व्यवसायात समाजाचा काही भाग गुंतला. गणाचे अधिपत्य त्या त्या कुलात, वंशातच ठेवले जाऊ लागले. नेतृत्व आनुवंशिक बनल्याने गणराज्य आणि राजेशाही यांच्यातील भेद वा वेगळेपण लोपले असावे. गणराज्यातील सद्गुणांचा ऱ्हास होऊन तेथील जीवन असुरक्षित बनले. रुढीप्रियता, दंभ, अनुवांशिकता आदींची वाढ झाली. त्यातून गणराज्यांचा ऱ्हास झाला असावा.
एकूण समाजच या प्रक्रियेद्वारे दुबळा आणि विखुरलेला होत गेला. अशा सोशिक समाजाला देशाच्या मध्यवर्ती सत्तेवर कोण आरूढ आहे हे जाणण्याची गरज भासली नाही.
गणसमाज मातृसत्ताक -
गणसमाजाचा मातृसत्ताकहा विशेष होता. व्यक्तीचे अधिकार, व्यक्तीची कुटुंब व समाजविषयक कर्तव्ये, त्यावरील सामाजिक बंधने या सर्वांचे नियमन स्त्रीकडून येणाऱ्या वारसापद्धतीने केले जाई. आजही स्त्रीव्रतांचे प्राबल्य, रेणुका, जगदंबा आदी स्त्री देवतांचे माहात्म्य यातून आजच्या समाजाचा प्राचीन काळाच्या मातृसत्ताक जीवनपद्धतीशी असलेला अनुबंध लक्षात येतो. शक्तीशिवाय शिव हा शवासमान असतो असे सांख्य तत्त्वज्ञान सांगते. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीतत्त्वाचे एवढे महत्त्व कसे याचा शोध घेताना अभ्यासकांना वैदिक संस्कृतीच्या कक्षेबाहेर जाण्याची गरज भासली आणि सिंधूसंस्कृतीच्या उत्खननामुळे या प्रश्नाचा मागोवा घेणे व निर्णय घेणे सुकर झाले. सिंधू नदीच्या खोऱ्यापासून ते नाईल नदीपर्यंत प्राचीन स्त्री देवतांचे
पान:भूमी आणि स्त्री.pdf/५७
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५२
भूमी आणि स्त्री