पान:भूमी आणि स्त्री.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही घो'. 'घो' म्हणजे नवरा.
 गणपती : सुफलतेचे दैवत -
 गणपती हे शिवाप्रमाणेच सुफलन प्रक्रियेशी संबंधित दैवत आहे. गणपती भाद्रपदात येतो. आषाढाच्या सुरुवातीस वा ज्येष्ठाच्या अखेरीस पेरलेले धान्य पणात येत असते. गणपतीपाठोपाठ गौरी येतात. १६गणपती या लोकदैवताचा प्रवास पाहणे महत्त्वाचे आहे. गण+ पती या दोन शब्दांचा मिळून हा शब्द तयार होतो.गण म्हणजे लोकसमूह त्याचा पालनकर्ता वा प्रमुख म्हणजे गणपती. गणपती या देवतेला तंत्रवाङ्मयात विषेश स्थान आहे. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात बृहस्पतीला उद्देशून गणपती असे म्हटले आहे. ऐतरेय ब्राह्मणांत 'गणानाम् त्वा गणपते' हा मंत्र बृहस्पतीस उद्देशून म्हटला आहे. लोकायताचा प्रणेता बृहस्पती होता म्हणून त्यास 'बार्हस्पत्यमत' असेही म्हणत. या वरून गणपती हा शब्द लोकायताशी निगडित आहे असे अनुमान काढता येते. गणपती म्हणजे लोकांचा नायक हा अर्थ मान्य करण्यास प्रत्यवाय नसावा या डॉ. देवीप्रसादांच्या मतास डॉ. स. रा. गाडगीळ आग्रहपूर्वक अनुमोदन देतात.
 आजही कर्नाटकात गणेशचतुर्थीचे आदले दिवशी तृतीयेला घुगऱ्या करतात. त्या उंदरांसाठी शेतात जाऊन टाकतात.
 गणपती : एक प्रवास : विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता -
 गणपती या दैवतास आपण विघ्नहर्ता, सुखकर्ता, सिद्धिदाता, बुद्धिदाता मानतो. प्रत्येक धर्मकार्यात त्याला प्रथम वंदन केले जाते. वगनाट्यातही पहिले नमन गणरायाला असते. गणेश हा शिवपार्वतीचा पुत्र मानला जातो. गौरी आणि शिव या अतिप्राचीन देवता असून दोहोंचे नाते सुफलीकरणाशी आहे. त्या दृष्टीने त्यांचा पुत्र मानलेल्या गणपतीचा प्रवास पाहणे महत्त्वाचे ठरते.
 इ.स. पूर्वी लिहिल्या गेलेल्या मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, मानवगृह्यसूत्र या ग्रंथांचा गणपती बद्दलचा अभिप्राय वेगळा आहे. त्या काळातील गणपती एक नसून तो समूह आहे. गणपतींनी पछाडलेल्या माणसांना भयानक स्वप्ने पडतात, ती वेडी होतात, स्त्रियांना संतती होत नाही, झाल्यास मृत्युमुखी पडते असे मानले जाई.ते रूप विघ्नकर्त्यांचे होते. हे तपशील मानवगृह्य सूत्रात दिले आहेत. गणपतीचे एक नाव विनायक. याज्ञवल्क्य स्मृती म्हणते की विनायकाची योजना महारूद्राने

५०
भूमी आणि स्त्री