पान:भूमी आणि स्त्री.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा उत्सव असतो. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन या चारही महिन्यांत जमिनीच्या सुफलीकरणाशी जोडलेली व्रते केली जातात. खरिपाची - पावसाच्या पाण्यावरची पिके आश्विनात भराला येतात आणि रब्बीच्या पेरणीचीही त्याच काळात घाई असते. सर्जन आणि वर्षनाशी संबंधित उत्सव - विशेष करून कुमारिकांचे उत्सव या काळात साजरे होतात. विदर्भ खानदेशात भुलाबाई भाद्रपद पौर्णिमेस बाळंतपणासाठी माहेरी येते. तिच्यासोबत भुलोबाची मातीची जोडमूर्ती मांडतात. तिच्या मांडीवर गणेश बाळ असते. हा भुलोबा म्हणजे शिवाचे रूप. विदर्भात दसऱ्याच्या आदल्या दिवशी इनाई या देवतेची स्थापना होते. शेतातील चिक्कण माती आणून तिची मूर्ती करतात. तिच्याबरोबर पती शंकर आणि दीर भांगलोबा असे दोघेही असतात. तसेच चिलया बाळ बरोबर असते. तिचे वाहन हत्ती असते. दीर भांगलोबा हा फार खोड्याळ आहे. तो मिरच्यांची, दवन्याची रोपे तुडवतो. फुलवंता माळीण गौरा उर्फ इनाईकडे तक्रार करते.
 भांगुलजी देर चाले रप रप
 मोडयलं रोप दवन्याचं
 फुलवंता माळीण आली घरावरी
 किती अर्जी करी भांगुलबाची
 दसऱ्याला सोने प्रथम इनाईला देतात. नंतर सर्वांना. सायंकाळी इनाईला कोतवालाच्या डोक्यावर ठेवून मिरवत जोंधळ्याच्या शेतात खड्डा करून त्यात ठेवले जाते. बरोबर शंकर असतो. विदर्भात श्रावणात भराडीगौर मांडतात. गौर मांडल्यावर दुसऱ्या दिवशी नदीवर जाऊन वाळूचा महादेव करतात.
 'खडक फोडू, माती काढू, निघा निघा गौराई' असे पाच वेळा वाळू काढताना म्हणतात. भुलाबाई, भराडी गौर, इनाई यांचेसोबत असणारे भुलोबा हे शिवाचे रूप असते. मूळ गौरव गौराईचा असतो. सर्जनात शिवाची भूमिका तटस्थ तरीही महत्त्वाची असते.
 प्रत्येक शेताच्या बांधावर म्हसोबा असतो, अर्थात दगडाच्या स्वरूपात. नांगरणी, पेरणी आदी महत्त्वाच्या कृषिप्रक्रिया सुरू करताना, तसेच अमावास्या पौर्णिमेस म्हसोबाला नारळ फोडला जातो. ढवारा म्हसोबासमोर केला जातो. म्हसोबा हा 'कुमार' असतो. मराठीत एक म्हण आहे - 'म्हसोबाला नाही बायको आसरांना

भूमी आणि स्त्री
४९