Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आदिमानवाने स्त्रीरूपी-भूरूपी विश्वजननीची पूजा केली. अन्नधान्याची विपुलता, भरपूर धनधान्य निर्मिती, भरपूर व सदृढ संतती, हेच सर्वधर्मातील देवी उपासनेचे प्रमुख प्रयोजन होते. जगातील सामान्यपणे सर्व समाजात भूमी देवता महामातेच्या, जगन्मातेच्या रूपात अवतरतांना दिसते. इंग्लंडमधील समाजव्यवस्था पुरुषप्रधान आहे. परंतु एकेकाळी तेथेही दैवतविकल्पनात महामातेला महत्त्व होते. गॅलिक लोक, सर्व देवता 'दानु' नामक भूमातेपासून निर्माण झाल्या असे मानतात. हिचाच दुसरा अवतार म्हणजे ब्रिटिश लोकांची महान भूमाता डॉन ही होय. एस्टोनियन धर्मानुसार भूमाता ही जन्म आणि मृत्यूवर सत्ता चालविते. चीन मध्ये भूमातेचा संप्रदाय वृक्षदेवतांशी संबंधित आहे. सी वॅंगमू ही त्यांची प्राचीन काळातील भूमाता. टाओ संप्रदायातील येन हे स्त्रीतत्त्व भूमीचे रूप म्हणून होते. ग्रीस व क्रीटमध्येही भूमातेची पूजा होई. भारतातील नवरात्र पूजा ही भूमातेची पूजाच आहे.
 फिनिश दैवतकथांत अक्का (Akka) ही भूमाता मानली जाते. मेक्सिकोमध्ये सेंटिऑटल आणि पेरु मध्ये ममा, पाचा या भूदेवता मानल्या गेल्या.
 देवीच्या नवरात्र महोत्सवात करावयाच्या धान्याच्या पुर्ननिर्मितीसाठीचा हा विधी जगभर याच स्वरूपात आढळतो. मातीच्या थाळीत पेरलेल्या धान्याला फ्रेजर 'गार्डन ऑफ ॲडोनिस' असे नाव देतो. नवरात्रातील 'घटस्थापना' ही भूमी आणि स्त्री यांची जननक्षमता-सुफलन शक्ती वाढविण्यासाठी केलेला यातुविधी आहे. या बाबतची चर्चा विस्तृतपणे पुढे केली आहे.
 कृषियातुविज्ञान आणि स्त्रीमाहात्म्य -
 सुफलीकरणाशी निगडित स्त्रीदेवतांचा शोध घेताना कृषियातुविज्ञान आणि स्त्री माहात्म्य यांचा अन्योन्य संबंध पाहणे महत्त्वाचे ठरते. कृषिजीवी अवस्थेचे दोन कालखंड कल्पावे लागतात. १. नांगराचा शोध लागण्यापूर्वीची प्राथमिक शेती, २. बैल, घोडा यांच्या साहाय्याने ओढल्या जाणाऱ्या नांगराची शेती. आज भारतात असलेल्या तोडा आणि खासी या जमातींच्या अवलोकनावरून लक्षात येते, तोडा ही जमात पशुपालनाचा व्यवसाय करणारी असून ती पुरुषप्रधान आहे तर खासी जमातीत शेती व्यवसाय प्राथमिक अवस्थेत आहे. ती जमात पूर्णपणे मातृसत्ताक आहे. बिफ्रॉ, बॅकोफेन या सारख्या संशोधकांनी असंख्य पुरावे देऊन सिद्ध केले आहे की, भटके व पशुपालन अवस्थेतील लोकांची समाज रचना पुरुषसत्ताक असते

भूमी आणि स्त्री
४१