Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपासक होता. तो लिंगयोनी रूपाने देवतांची पूजा करी. तेथील उत्खननात सापडलेली एक महत्त्वाची मुद्रा अशी, खाली डोके, वर फाकलेले पाय, अशा स्त्रीच्या योनीतून एक वनस्पती उगवली आहे. विश्वातील जिवांचे भरणपोषण करणारी वनस्पतीसृष्टी भूमातेच्या....जगन्मातेच्या देहातूनच संभवते हे या प्रतिमेतून सूचित होते. मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यात देवी पुढील उद्गार काढते- 'हे देव हो जीवनावश्यक अशा वनस्पतीसृष्टीच्या साहाय्याने मी सर्व विश्वाचे धारण-पोषण करीन, पर्जन्यकालात ही वनस्पतीसृष्टी माझ्या देहातून उत्पन्न होईल 'आत्मदेह समुद्भव' त्यामुळे मला शाकांबरी हे नाव प्राप्त होईल या उद्गारातून भूमाता आणि जगन्माता यांच्यातील साम्य नेमकेपणाने व्यक्त होते.
 प्राचीन काळी जेव्हा भौतिक ज्ञानाचा पूर्णपणे अभाव होता तेव्हा निसर्ग आणि स्त्री यांच्या सुफलीकरण प्रक्रियेचे प्राथमिक मानवाने जे मंत्रतंत्रात्मक शास्त्र तयार केले, ते त्याच्या प्राथमिक अवस्थेतील अप्रगल्भ अशा विचार शक्तीशी सुसंगत असे आहे. स्त्री आणि भूमी यांच्या साधर्म्यातून कृषि यातुविज्ञान निर्माण झाले. या यातुविज्ञानाने मानवी संस्कृतीच्या इतिहासातील फारमोठा कालखंडव्यापून टाकला आहे. भारतातील मातृदेवतांचा, तसेच आजच्या कृषिधर्मातील विविध व्रते, सण, उत्सव आदींचा विचार करताना यातुविज्ञानाचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. कारण जगभरच्या मानवी कल्पनासृष्टीत, श्रद्धाविश्वात स्त्री आणि भूमी यांचे साम्य सुनिश्चित आहे. स्त्रीला 'क्षेत्र' ही संज्ञा दिली जाते.
  क्षेत्रभूता स्मृता नारी बीजभूतः स्मृतः पुंमान्।
 स्त्री आणि भूमी - (जागतिक अनुबंध)
 निरनिराळ्या धार्मिक विधींत, विशेषतः सुफलीकरण विधींत भूमी आणि भूमीतून उगवणाऱ्या वनस्पतीयांचा स्त्रीशी संबंध येऊ दिला जातो. विविध धान्ये तऱ्हेतऱ्हेच्या पत्री, फुले, दुर्वांकुर हरितवस्त्र हे सुफलीकरण विधीचे घटक आहेत. भूमीच्या सर्जनक्षमतेचे स्त्रीवर केलेले प्रोक्षेपणया विधीतून जाणवते. उदा. - मंगळागौरीसाठी २१ प्रकारची पाने तऱ्हेतऱ्हेची फुले लागतात, लक्ष्म्यांसाठी धान्याच्या राशी मांडतात. हादग्यात रोज धान्यानी हत्ती रेखाटला जातो. श्रावण सोमवारी शिवामूठ दरवेळी वेगळ्या धान्याची वाहतात. नवरात्र, चैत्रात भूमीत मिश्रित धान्य पेरून अंकुरांची पूजा केली जाते. यातून असे लक्षात येते की विविध विधींच्या माध्यमातून

४०
भूमी आणि स्त्री