Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यात अंगभूत साम्य आहे. विलक्षण एकात्मता आहे. चारही दिशांनी नैसर्गिक सीमा रेषांनी बंदिस्त असलेल्या या देशातील महाकाय भूभागातील एकात्मता अभूतपूर्व आहे. चकित करणारी आहे. तसेच 'राष्ट्र' या संकल्पनेला चैतन्य देणारी आहे.
 ऋतुचक्र आणि भारतीय सण, उत्सव -
 ऋतुचक्र, त्यानुसार नक्षत्रांची बदलती स्थाने, निसर्गाच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या स्वरूपाचे सूक्ष्म आणि सर्वांगीण निरीक्षण करून , तसेच ऋतुचक्राचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव लक्षात घेऊन विकसित झालेले सण, उत्सव, व्रते, तत्संबंधी गीते त्याचे स्वरूप समानधर्मी राहिले आहे. उदा. - चैत्रातील पाडवा भारतभर साजरा होतो. 'गौरी' चे व्रत सर्वत्र पाळले जाते.बंगालात घर नव्या कोवळ्या पानाफुलांनी सजवितात. सुंदर रांगोळ्या काढतात. देवीचा पाठ वाचला जातो. नवीन तांदळाचे पदार्थ केले जातात. आंध्रात याला 'उगादी' म्हणतात. हा सण जणु नव्याने बहरणाऱ्या निसर्गाच्या स्वागताचाच ! चैत्रात बहरणारा निंबाचा मोहोर, चिंचा आंब्याचा मोहोर वगैरेत गूळ घालून केलेली चटणी, त्यादिवशी सर्व जण खातातच. मध्य प्रदेशातील ठाकूर समाजात चैत्रातही नवरात्र बसविले जाते. पाटावर नऊ धान्याचे नऊ ढीग मांडतात. कलशाची पूजा करतात. नऊ दिवस अखंड ज्योत असते. नव ज्योतींनी देवीची आरती होते. प्रसाद म्हणून साजूक तुपातला शिरा करतात. त्यात काळी मिरी टाकतात. सायंकाळी कुमारिकांची त्यांचे पाय धुऊन पूजा करतात. सिंधी मंडळी या दिवसाला 'चेट्टीचांद' म्हणतात. महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. कर्नाटकात लिंबाची पाने गरम पाण्यात घालून स्नान करतात. या दिवशी भारद्वाज पक्षी पाहणे शुभ मानले जाते. राजस्थानात कुमारिका गणगौर मांडतात. विवाहानंतर या व्रताचे उद्यापन पाडव्यानंतर केले जाते. गणगौरीतही लिंमडीच्या फांदीला विशेष महत्त्व. चैत्रानंतर सहा महिन्यांनी आश्विन अंगणात येतो. तो थंडीची दुलईघेऊन. आश्विनातले नवरात्र भारतभर साजरे होते. चैत्रात देवीच्या पूजेला महत्त्व तसेच आश्विनातही देवीपूजेला महत्त्व. आश्विन महिन्याला 'क्वार का महिना' म्हणतात. भाद्रपद, आश्विनातील सारे उत्सव आणि व्रते जमिनीची सुफलता वाढावी यासाठी असतात, जमिनीला आकंठ भिजवून टाकणारा, तिला आर्द्रा करणारा पाऊस पडावा, जमिनीत पेरलेले बीज रुजून तरारलेल्या कणसांच्या दाण्यांमधून मधुर अन्नरस पूर्णत्वाने भरावेत ही कामना या सणांच्या व व्रतांच्या मुळाशी असते. अन्न ही जीवनाची प्रेरणा आहे, मूलभूत गरज आहे. म्हणून

२६
भूमी आणि स्त्री