पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भारतीय संस्कृतीचा इतिहास हा समाजनिर्मितीचा इतिहास -
 भारतीय संस्कृतीचा इतिहास हा समाजनिर्मितीचा इतिहास आहे. दास, दस्यू, पणीन्, आर्य, द्रविड, नाग आदी अनेक टोळ्यांच्या संघर्ष-समन्वयातून येथील समाज सुसंघटित होत गेला.ज्यांचे जवळ आधिक चांगली शस्त्रे होती ते जेते बनले. शस्त्र, शास्त्र, धर्म, तराजू यांच्या बळावर भारतात स्थिर झालेली ही सारी माणसेच होती. भारताच्या भौगोलिक रचनेने त्यांच्यातील माणुसकी सतत जपली. वैदिक आणि लौकिक या दोन धारा समान्तरपणे समाजाला कवेत घेऊन वाहत राहिल्या. वैदिकांचे देव निसर्गातील श्रेष्ठ शक्तींची प्रतीके आहेत. उदा. - वरुण, अग्नी, उषस् इत्यादी निसर्गातील श्रेष्ठ शक्ती पाहून त्यांच्याबद्दल भीती आश्चर्य, आदर, कृतज्ञता इत्यादी भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्या असाव्यात. त्यातून त्या श्रेष्ठ शक्तीला 'हवी' देऊन प्रसन्न करता येते ही कल्पना स्फुरली. तीच वैदिकांच्या देवता आणि पूजा पद्धतीच्या मुळाशी आहे. लौकिकांची दैवतकल्पना अधिक आदिम आणि निसर्गात आढळून येणाऱ्या प्रजनन वा सर्जन प्रक्रियेशी जोडलेली आहे. कारण त्यातून 'वृद्धी' होते. या दोन्ही धारांनी एकमेकांच्या दैवतांचा, विधींचा कालौघात स्वीकार केला. या धारांच्या दोनही अनुबंधातून एक नवी संस्कृती निर्माण झाली. काही देवता समाजातून लोप पावल्या, काहीचे रूपान्तर झाले, काहीचे उन्नयन होऊन नव्या स्वरूपात स्थिरावल्या. एकाहून अधिक देवतांचे एकत्रीकरण होऊन काही दैवते स्थिरावली. उदा. दत्तात्रय. या दोनही धारांतले अनुबंधात्मक नाते लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
 भारताची भौगोलिक रचना एकात्मतेसाठी अनुकूल -
 भारताची भौगोलिक रचना एकात्मतेच्या वाढील नेहमीच अनुकूल राहिली. पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेला सागारांची सीमा तर उत्तरेला पूर्व पश्चिम पसरलेला महाकाय हिमालय, अशा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित अशा सीमा भारताला लाभलेल्या आहेत. निसर्गाच्या विविधतेने आणि समृद्धीने नटलेल्या या महाकाय देशाबद्दल मानवाला नेहमीच आकर्षण वाटले. येथील समृद्धीच्या आकर्षणाने आलेल्या टोळ्या इथेच स्थिरावल्या. या भौगौलिक विशिष्ट वास्तवामुळे या भूभागात राहणारा मानवसमूह सांस्कृतिकदृष्ट्या एकात्म राहू शकला. आजही भारताच्या विविध प्रान्तांतून साजरे होणारे लोकोत्सव मग ते आदिवासी, नागर, ग्रामीण समाजातील लोकसमूहांचे असोत, त्यांचे स्वरूप वरपांगी आणि तपशिलांबाबत काहीसे वेगळे असले तरी

भूमी आणि स्त्री
२५