पान:भूमी आणि स्त्री.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कालप्रवाहाच्या ओघात जमिनीच्या सुफलतेशी जोडलेले उत्सव, विधी, व्रते यांचे अवशेष विविध रूपांत अस्तित्त्वात आहेत.
 आदिपर्वातील यातुश्रद्धा आणि समूहश्रद्धा -
 यातुश्रद्धा ही मानवी संस्कृतीची आदिपर्वातीलसमूह श्रद्धा आहे. जगणे ही सर्वच प्राणिमात्रांची आद्य आणि महत्त्वाची प्रेरणा असते. शरीरधारणेसाठी, जगण्यासाठी अन्न हे आवश्यकच असते. आदिमानवाला अन्नप्राप्तीसाठी, जगण्यासाठी निसर्गाशी सातत्याने झगडावे लागले. स्वतःचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या गरजेतून संघर्षमय वृत्ती तयार झाली. टोळीअवस्थेत राहणाऱ्या माणसांचे प्रश्न समूहाचे होते. व्यक्तीचे नव्हते. सभोवतालच्या परिस्थितीशी संघर्ष करून तर कधी विविध मार्गांनी त्याला काबूत ठेवून त्याने भौतिक प्रश्नांशी संवाद साधला. वास्सवावर पकड ठेवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे यातुविधी. जे घडणे वा घडविणे आपल्या हाती नसते. जे घडल्याचे व घडण्यातून झालेल्या आनंदाचे आपण फक्त स्वप्नच पाहू शकतो. त्याहीपेक्षा ते कसे घडेल याचे नाट्यीकरण करून त्यातून होणाऱ्या आनंदाचे प्रत्यक्ष समाधान घेऊ शकतो. अशा कृतीतून ते घडण्याची शक्यता वाढते, अशी श्रद्धा आदिमानवात निर्माण झाली. त्यातूनच यातुविधींचा जन्म झाला. जीवनाकडे सकारात्कम दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका आदिम लोकसमूहाने सुरुवातीपासूनच घेतली. प्राथमिक अवस्थेतील कृषिसमाजात निसर्गातील घडामोडीमागील कार्यकारणभाव समजण्याची बौद्धिक झेप नव्हती. त्याकाळात या यातुविधींनाच अपार महत्त्व होते यातुविधींचा समूहमनांवर अपार पगडा होता. समूहजीवनात त्यांचे महत्त्व होते. ते यातुविधी नेमके कसे होते. त्यांचे स्वरूप कसे होते याचे निश्चित ज्ञान होणे आज हजारो वर्षांनंतर अवघड आहे. परंतु जगभराच्या आदीवासींच्या जीवनाचा सूक्ष्म अभ्यास आज केला जातो. त्यातून स्वरूप थोडे फार लक्षात येते. काही निष्कर्ष काढता येतात.
 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाचे मन ! मानवी मन हे एक चमत्कारिक प्रकरण आहे. एकीकडे भविष्यात धाव घेताना ते कुठे तरी मनाच्या तळाशी भूताचे भूत जपत असते आणि वर्तमानावर ते छाया धरून असते. आजही मानवाची प्राथमिक गरज असलेल्या अन्नसमृद्धीशी वर्षनसर्जनाशी जोडलेल्या व्रतोत्सवात

भूमी आणि स्त्री
२७