मराठवाड्यातील वा महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकूण भारतातील भूमीच्या सुफलीकरणाशी जोडलेले विधी, उत्सव अत्यन्त पुरातन आहेत. त्यांच्या पृष्ठावरील जमीन, वैदिक जीवनधारणा भारतीय लोकमानसात स्थिर होण्यापूर्वीची आहे. भारतीयांच्या जगण्यात हे विधिउत्सव 'आदिबंध' रूपात गोंदले गेले आहेत.
लोकसंस्कृतीच्या हृदयातील स्पंदने जणु पं. वासुदेवशरण अग्रवालांशी संवाद करीत. ते म्हणतात की, 'लोक' हा भारतीय जीवनाचा महासमुद्र आहे. त्यात भूत, वर्तमान, भविष्य साठवलेले आहे. 'लोक' हे राष्ट्राचे अमर रूप आहे. अर्वाचीन मानवासाठी 'लोक' सर्वोच्च प्रजापती आहे. लोक, लोकधात्री भूमाता, आणि 'लोक'चे व्यक्त रूप मानव हेच आपल्या नव्या जीवनाचे अध्यात्मशास्त्र आहे. लोक, मानव आणि भूमी या त्रिपुटीत जीवनाचे कल्याणमय रूप आहे.
लोकसाहित्य - लोकसंस्कृती ही सतत प्रवाही असते. त्यामुळे ती नेहमीच नवनवोन्मेषशालिनी असते. त्याच्या अभ्यासाची पायाभरणी महाराष्ट्रात इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर आदींनी केली. चिकित्सक दृष्टी आणि योग्य दिशा देण्याचे काम दुर्गाबाई भागवतांनी केले. या शाखेला विविध अंगांनी समृद्ध करण्याचे काम रा.चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. भाऊ मांडवकर, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. दा.गो. बोरसे, डॉ. तारा परांजपे, डॉ. मोरजे, यांनी केले. डॉ. पुष्पलता करनकाळ, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. व्यवहारे, डॉ. दिनकर कुलकर्णी आदी अनेक अभ्यासक ही परंपरा पुढे नेत आहेत.