Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ज्या संकरात स्त्री श्रेष्ठ वर्णाची व पुरुष निम्न वर्णांचा या विवाहांना प्रतिलोम म्हटले जाते. ज्या संकरात पुरुष श्रेष्ठ वर्णाचा आणि माता निम्न वर्णाची त्याला अनुलोम म्हणतात. अनुलोम संकरात सर्वसाधारणपणे पुरुषाचा वर्ण संततीला मिळे. मात्र प्रतिलोम विवाहातून निर्माण झालेल्या जाती 'शूद्र' मानल्या गेल्या. आई श्रेष्ठ असली तरी आईची जात मुलाला मिळाली नाही. वरील सर्व संकरात माता श्रेष्ठवर्णाची आहे तर पुरुष निम्न वर्णाचा आहे. वरील सर्व जाती श्रेष्ठ नाहीत. त्या शूद्रात जमा होणान्या आहेत.
 भूमीची सुफलता वाढावी या हेतूशी जोडलेल्या विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानतेचा शोध घेताना वरील विवेचन महत्त्वाचे ठरते. शेती हा व्यवसाय प्रामुख्याने वैश्य, शूद्रांचा होता. बहुजन समाजाचा होता. आजही महाराष्ट्रात कुणबी, माळी, आदी जाती शेती व्यवसायात आहे. वेगवेगळ्या आर्येतर समाजांना विविध जातीत विभागताना नेमके काय घडले असावे याचे विवेचन करताना 'समाज आणि धर्म : ऋग्वेद काळ ते पुराणकाळ' या ग्रंथात श्री. जयंत गडकरी लिहितात, 'इतर आर्येतर समाजातील पुरोहितवर्ग आणि टोळी संघप्रमुखांना वरिष्ठ वर्णीयांत सामील करून घेण्याचे विधी ब्राह्मणांनी वापरले असावेत. आर्येतर समाजातील इतर सामान्य माणसांना वर्णचौकटीत समाविष्ट करून घेण्याचा प्रश्न, त्यांना शूद्र वर्णांतर्गत जातीत घेऊन सोडवला असावा हे स्पष्टपणे दिसून येते. समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत आपले श्रेष्ठत्व नष्ट होईल या भीतीतून शुद्धत्वाची ग्वाही देण्याकरिता या समाज समूहांना खालचा दर्जा देण्याकरिता 'संकर कल्पना' शोधून काढली असावी. ज्या पुरोहित वा टोळी संघप्रमुखांना वरिष्ठ वर्गात सामील करून घेतले त्यांना ब्राह्मणवर्गात समाविष्ट करून घेतले. गुजरातेत ८४ प्रकारच्या ब्राह्मण जाती आहेत. ब्राह्मणात पंच गौड व पंचद्रविड असे १० भेद आहेत. त्यांच्यात पूर्वी बेटी व्यवहार नव्हता.
 जी स्त्री 'मातृदेवता' म्हणून पूजिली गेली, जी जीवनपद्धतीची अधिष्ठात्री होती तिची गणना 'व्यवहार' करण्याच्या एका वस्तूत झाली असे लक्षात येते. या संदर्भात एक महत्त्वाची बाब अशी. स्त्री ही 'वाहक' असते. एक स्त्री शिकली तर ती पुढच्या पिढीला, सासरमाहेरच्या कुळांत आत्मसात केलेले शिक्षण सहजपणे देत असते. आणि म्हणून स्त्रिया ज्या ज्या वर्णात गेल्या तिथे त्यांनी त्यांच्या मनात

२७६
भूमी आणि स्त्री