Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रूजलेले कृषिविषयक यातु श्रद्धांचे आदिबंध नेले. स्त्रीप्रधान जीवनव्यवस्था मुळापासून उखडून टाकण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले असावेत असे अनेक अभ्यासकांना वाटते. आणि तरीही स्त्रियांनी कृषिसुफलनाशी निगडित श्रद्धा विधिव्रतांच्या माध्यमातून, धर्माशी त्यांचे नाते जोडून जतन केल्या. हे त्यांनी जाणीवपूर्वक केले असे मुळीच नाही. मुळात कृषिसुफलनाच्या विधींचे स्वरूप 'यातु' शी जोडलेले होते. धर्माचे मूळ 'यातु' वा जादूत आहे ही वस्तुस्थिती जगन्मान्य आहे. या विधिउत्सवांना स्त्रियांनी सहजपणाने धर्माधिष्ठित कर्माशी जोडून घेतले. ही बाब समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मातृसत्ताक समाजव्यवस्थेकडून पितृसत्ताक समाजव्यवस्थेकडे जाण्याच्या वाटचलीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
 कौटिलीय अर्थशास्त्र आणि स्त्रीचे अधिकार -
 जाती, वर्ग यांत विभागलेल्या समाजाला - भारतातील समाजाला एक छत्राखाली आणण्याचा प्रयत्न प्रथम चाणक्याने केला. हे कार्य करताना कौटिल्याच्या गण आणि संघराज्यातील सामान्य कुटुंबांना नव्याने लागवडीखाली येणाऱ्या प्रदेशात, त्यांच्यात गट पाडून पाठवावे लागले. वेगवेगळ्या गण व संघ राज्यांतील कुटुंबे विखुरली गेली. परंतु एक संघटित असे राष्ट्र निर्माण झाले. नियम केले गेले. चाणक्याचा काळ मनूच्या पूर्वीचा आहे. चाणक्य स्त्रियांच्या बाबतीत वैदिक हिंदू धर्मग्रंथांपेक्षा उदार आहे. सर्व समाजांना एकाच सांस्कृतिक छत्राखाली आणण्यासाठी त्याने नियम केले. या काळात कुंटुंबसंस्था स्थिर होत गेली. विवाहाचे आठ प्रकार कल्पिले गेले. पोटगी, स्त्रीधन, घटस्फोट या बाबतचे कायदे झाले. परदेशांत गेलेल्या, राजाचा अपराध केलेल्या, पत्नीच्या जिवावर उठलेल्या पतीचा त्याग करण्याची संमती कायद्याने दिली होती (३/३ २५ ते २९) या काळात उद्योगांचा विकास झाला. मातृसत्ताक जीवनपध्दतीत सूत काढणे, विणणे हे व्यवसाय स्त्रिया करीत. त्यात त्या वाकबगार होत्या. कौटिल्याच्या काळात लोकर, अंबाडी, कापूस, वृक्षाची साल, सण यापासून सूत काढण्याचे काम स्त्रियांना दिले जाई. विधवा, पंगू स्त्रिया, कन्यका, घर सोडलेल्या वा घरातून बाहेर काढलेल्या स्त्रिया, वेश्यांचा माता, देवसेवा बंद झालेल्या देवदासी, घराबाहेर न पडणाऱ्या उच्चवर्णीय स्त्रिया यांना हे काम देण्याची व्यवस्था सूत्राध्यक्ष करी. हे काम सदर

भूमी आणि स्त्री
२७७