स्त्रिया आणि कृषि यांच्यातील एकरूपता समाजमनात एवढी रुजली होती की वेदांतील कृषिविषयक ऋचांत कृषिदेवता या स्त्रीरूपी आहेत. ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलात सीता या कृषिदेवतेस आवाहन केले आहे.
अर्वाची सुभगे भव सीते वन्दामहे त्वा ।
यथा नः सुभगाससि यथानः सुफलासासि ॥
इन्द्रः सीतां गृह्णातु तां पूषानु यच्छत ।
सां नः पयस्वती दुहमुत्तरामुत्तरां समाम् (४.५६.६.७)
(हे समृद्धीरूप सीतादेवी, तू आम्हाला विपुल धन आणि विपुल फलसंपत्ती देण्यासाठी उपस्थित राहा, इंद्र आणि पूषन तुला मार्गदर्शन करोत. ही सीतादेवी जलसंपत्तीचा दुग्धाप्रमाणे वर्षाव करते.) या ऋचेत 'सीता' या देवीला कृषिविषयक मंत्र असल्याने आवाहन केले असले तरी 'इन्द्र आणि पूषन् तुला मार्गदर्शन करोत' असे या पुरुष देवतांना आवाहन केले आहे. कारण वैदिक आर्यांचे विचारविश्व पुरुषप्रधान आहे. पुरुषसूक्त हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विराट विश्वपुरुषाच वर्णन पुरुषवाचक आहे. उत्तरकालीन ऋचांमध्ये विश्वतत्त्व स्त्री - पुरुष लिंगभदा पलीकडचे कल्पिले असले तरी, पुरुषसूक्तात ते पुलिंगी आहे. इतकेच नाही तर त्यांचे यात्वात्मक लैंगिकविधी व मंत्र पुरुषप्रधान आहेत. त्यांची प्रतिभासृष्टा गोविषयक कल्पनांनी बहरलेली दिसते. 'गविष्टी' हा युद्धवाचक शब्द मुळात गोविषयीची कामना या अर्थाचा आहे.
कृषिव्यवसाय स्वीकारला पण त्याला प्रतिष्ठा दिली नाही -
वैदिक आर्यांनी भारतात स्थिरावताना कृषिव्यवसायाचा स्वीकार केला. कारण नद्यांच्या काठाने राहणाऱ्या लोकांनी कृषिव्यवस्था समृद्ध केलेली होती. आर्य टोळ्या पशुपालन अवस्थेत असेपर्यंत शेतीशी संबंध न आल्याने तांदूळ हे महत्त्वाचे धान्य, तैलबीजे त्यांना अज्ञात होती. यज्ञाविधीमध्ये दूध, तूप, लोणी मध यांचाच विनियोग सांगितला आहे.
आजही भारतात अस्तित्वात असलेली, पशुपालनाशिवाय कोणताही व्यवसाय न करणारी तोडा या जमातीची संघटना पूर्णपणे पितृप्रधान आहे. पशुपालक