Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रंगपंचमी, चैत्र वैशाखातील गौरीतृतीया- अक्षय्यतृतीया, या पूजा विधीत आणि उत्सवात स्त्रियांचाच सहभाग असतो. स्त्रियांची व्रते, पूजाविधी या संदर्भात अवनीन्द्रनाथ टागोर नोंदवतात, 'The Desire of the male and the desire of the female - the Vedic rituals were of the men, the vratas of the women - that is all the difference between two.'
 अवनीन्द्रनाथांच्या या मताबद्दल 'लोकायत'चे लेखक देवीप्रसाद चटोपाध्याय म्हणतात, २'The vratas he has rightly said, could not have been derived from the vedas, the two were aspects of two distinct cultures , so he has attributed the vratas to the Pre-Aryans.' या संर्भात स्पष्टीकरण देताना ते नोंदवितात की वैदिक आर्यांच्या प्रार्थना भरपूर धनसंपत्ती, धान्यसंपत्ती, दीर्घायुष्य, सुरक्षित आणि संकटरहित जीवन यांच्यासाठी असल्या तरी त्यात विशेष भर पशुसमृद्धीवर आहे आणि स्त्रियांच्या व्रतांत, पूजाविधीत कृषिलक्ष्मीवर, भरपूर धान्य भूमीतून निर्माण व्हावे यावर विशेष भर दिलेला आहे. धान्यराशींची पूजा, धान्याची रांगोळी, पूजाविधीत फुले, पत्री, दुर्वा यांचा अंतर्भाव त्यात असतो.
 भारतात अनेक टोळ्यांची आक्रमणे होत गेली. त्यांतून दोन सांस्कृतिक धारा निर्माण झाल्या. एक वैदिकधारा आणि दुसरी लोकधारा. या दोनही सांस्कृतिक धारांनी परस्परांना योगदान दिले आहे. वैदिकधारा ही अधिक 'नागर' आहे. तर लोकधारेत सामान्य माणसाच्या जीवनप्रेरणा समाविष्ट झालेल्या दिसतात. देवीप्रसाद आपले मत नोंदवतात की वैदिक विचारसरणीचा प्रभाव भारतात स्थिर होण्यापूर्वी, भारतातील समाज हा कृषिजीवी होता आणि मातृप्रधान जीवन व्यवस्था होती. स्त्रियांचे कृषिव्यवसायात विशेष योगदान होते. किंबहुना भूमीच्या सुफलनाशी जोडलेल्या विधीत स्त्रियांना महत्त्व असे, त्यांच्याद्वारे ते केले जात असे जगभरचा इतिहास सांगतो.
 वैदिक आर्यांचे पुरुषप्रधान विश्व -
 वैदिक समाज पशुपालक होता. कालौघात त्यांना कृषीचे महत्त्व पटले. त्यांनी कृषिव्यवसायाचा स्वीकार केला. तरीही कृषिव्यवसायाला त्यांनी श्रेष्ठत्व दिले नाही.

२७०
भूमी आणि स्त्री