Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाची नैसर्गिक प्रवृत्तीच पुरुषप्रधान संघटनेला अनुकूल असते. पशुपालक आर्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन असल्याने, भारतात स्थिर होताना कृषि व्यवसाय स्वीकारला तरी त्याबद्दलचा तिरस्कार बोधायन, मनु यांच्या वाङ्मयातून व्यक्त होतो. सूत्रकाळात गीतेने शेती हे वैश्यांचे स्वभावज कर्म असल्याचे सांगितले आहे. बौधायन धर्म सूत्रांत मात्र बोधायन म्हणतो -

 वेदः कृषिविनाशाय कृषिर्वेद विनाशिनी ।
 शक्तिमानुभयं कुर्यादशक्तस्तु कृषि त्यजेत ।। (बो. ध.स. १.५.१०१)

शक्य असेल त्याने दोन्ही करावे. अन्यथा कृषिकर्म सोडावे. मनूचे मत-ब्राह्मण किंवा क्षत्रियाला वैश्याचे व्यवसाय करण्याची पाळी आली तर त्याने शेती वगळून अन्य व्यवसाय करावेत. शेती ही परावलंबी असून त्यात जीवहत्या होते. (१०८३-८४) आर्यांची युद्ध करण्याची हत्यारे आधुनिक होती. येथील जित लोकांकडे त्यांनी हा व्यवसाय सोपविला होता. वाढत्या लोक- संख्येला अन्न पुरविण्याची शक्ती कृषि व्यवसायात होती. त्यासाठी श्रम लागत. ते श्रम 'जिंता' कडून दासपद्धतीद्वारे करवून घेतले जात.
 भारताच्या एकात्म संस्कृतीतील 'एकात्मते' चा शोध घेताना ही एकात्मता कशी निर्माण झाली. कोणत्या परिस्थितीत झाली आणि त्यासाठी पुढाकार प्रथम कोणी घेतला याचा थोडक्यात आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.
 टोळ्यांच्या संकराचा इतिहास : संस्कृति संगमाचा इतिहास -
 भारताचा इतिहास हा अनेक टोळ्यांच्या आक्रमणांचा, त्यातून झालेल्या संकराचा इतिहास आहे. या टोळ्या ज्या प्रदेशात गेल्या, तेथे आधीपासून राहणारा समाज आणि आक्रमण करणारा समाज यातून त्या त्या परिसरात छोटी छोटी राज्ये निर्माण झाली. ती गणराज्ये होती. हा आढावा घेताना एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनाचे, वैदिक आर्य आणि लोकायतिक हे प्रमुख घटक होते. वैदिक आर्यांनी स्थानिक प्राकृत जनांच्या आचारविधींचा, त्या मागील श्रद्धांचा तिरस्कार उल्लेख केला तरीही त्यांच्या अनेक आचार विधींचा, त्यामागील श्रद्धांचा आपल्या धार्मिक व्यवहारात समावेश करून घेतला. 'शिश्नदेव' म्हणून लिंगपूजेचा तिरस्कार केला. परंतु अनार्यांचा रुद्र व शिव देवता शंकराच्या व

२७२
भूमी आणि स्त्री