पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्रते,विधी, उत्सव भूमीच्या सुफलीकरणाच्या श्रद्धेतून निर्माण झाले आहे. मात्र या व्रतांत 'वर्षन' हे कारण नसून 'सूर्य' हे कारण आहे.
 अक्षय्य तृतीया : अक्षय्य आनंदाची ग्वाही -
 महिनाभरचे माहेरपण संपवून लेकुरवाळी गौर, अक्षय्य-तृतीयेस परत जाते, ती घराला 'अक्षय्य आनंदा'चा, समृद्धीचा आशीर्वाद देऊन ! अक्षय्यतृतीयेला गौरीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून, आंब्याची डाळ, पन्हे, टरबूज, खरबूज, काकडी यांच्या फोडी सवाष्णी व कुमारिकांना देऊन. निरोप देतात. घर धनधान्यांनी, मुलबाळांनी भरलेले राहवे यासाठी गौरीची पूजा केली जाते. अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह होतात. महाराष्ट्र- मराठवाड्यातील शेतकरी पेरणीचा मुहूर्त या दिवशी प्रतीकात्मक रीतीने करतात. या दिवशी प्रारंभ केलेली कामे हमखास पूर्णत्वाला पोहोचतात अशी श्रद्धा आहे. घरात साठवून ठेवलेल्या भाजी पाल्यांच्या बिया होळीच्या राखेत घोळून, मडक्यात घालून ठेवतात. हे मडके अक्षय्य तृतीयेला मोकळे करून त्यातील बिया पेरतात. अंगणात टोचून लावतात. या बियांतील सुफलनशक्ती होळीच्या राखेमुळे वाढते. होळीची राख वेलींच्या आळ्यांतही मिसळतात. भोपळा, तोंडली, दोडकी, घोसाळी, पडवळ यांसारखे भाजीचे वेल या दिवशी लावतात. त्यांना भरपूर फळे येतात अशी श्रद्धा आहे. दक्षिणेत अक्षय्य तृतीयेला त्रेतायुगाचा आरंभ झाला असे मानतात. तर उत्तर भारतात हा दिवस सत्ययुगाचा आरंभदिन मानला जातो. बंगाल ओरिसात तीन आठवडे चंदनोत्सव साजरा करतात. चंदनयात्रा भरते. चंदनाचे पंखे, तेल, अत्तर ब्राह्मणाला दान देतात. महाराष्ट्रात पुरोहितांना माठ, आंबे, पन्हे, आंब्याची डाळ देतात. या दिवशी समुद्राच्या लाटा उंचउंच उचंबळतात असा समज गुजरातेत आहे. गुजरातेत काही गावांत समुद्रकिनारी२३ प्रतीकात्मक गाव उभे करतात. त्यात जीवनोपयोगी धान्य, वस्तू, कापूस, साखर ठेवतात. तांब्याचे नाणे 'राजा' म्हणून आणि सुपारी 'दिवाण' म्हणून ठेवतात. दुसऱ्या दिवशी या गावाची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी सारे गाव लोटते. त्यातून भविष्यकाळचे अंदाज बांधतात. उदा. धान्य लाटेत वाहून गेले वा त्याला मुंग्या किडे लागले तर ते महाग होईल, कापूस ज्या दिशेने उडाला त्या दिशेने निर्यात चांगली होईल असे

भूमी आणि स्त्री
२५९