पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहाटे उठून प्रत्येकला उठवते. प्रत्येक जण उठल्यावर या थाळीतील प्रत्येक वस्तू पाहतो. अन्न देवतेला प्रणाम करतो. आरसा पाहून हसतो. वर्ष हसतमुखाने जावे. वर्षाची सुरुवात धान्य लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या गृहलक्ष्मीचे दर्शन घेऊन करावी हा हेतू या परंपरेमागे असावा. थाळीतील तांदळाचा 'मीठा पुलाव' साखरभात प्रसाद म्हणून करतात.
 केरळमध्ये नव्या वर्षाच्या दिवसाला 'विषु'म्हणतात. प्रातःकाळी उठल्यावर चांगल्या वस्तूवर दृष्टी पडली तर वर्ष चांगले जाते ही कल्पना काश्मीरप्रमाणे केरळातही आहे. त्यामुळे आदल्या रात्री काशाच्या भांड्यात तांदूळ पसरून त्यावर कोन्ना नावाच्या झाडाच्या पिवळ्या फुलांची आरास करतात. त्यात सुवर्णाचे अलंकार चांदीचे रुपये, मोठी पिवळी काकडी, नारळ, धूत वस्त्र ठेवतात. दोन्ही बाजूंनी समया लावून ठेवतात. या सजावटीला 'विषुकणि' म्हणतात. उठल्यावर घरातील सर्व जण विषकणीचे दर्शन घेतात. वर्ष शुभते जावे हीच या मागची भावना असते.
 आसाममध्ये वैशाख प्रतिपदेस वर्षाची सुरुवात होते. या दिवसाला खूप महत्त्व असते. या दिवसाला 'बहाग बिहू' किंवा 'रंगाली बिहू' म्हणतात. कडुलिबांची डहाळी आणून घरात टांगतात. एक महिना कडुलिबांच्या पानांची चटणी खातात. कडुलिंब आरोग्यास लाभदायक उन्हाळ्यात गोवर, कांजिण्या, ज्वर या सारखे विकार होतात आणि कडुलिंब हा रक्तशुद्धी करणारा. त्याच्या पाण्यात न्हायल्यास कातडीचे रोग पळतात. भारतीय सण खानपानाच्या रीतीतून सामाजिक आरोग्याशी कसे जोडलेले आहेत याची कल्पना येते. या काळात धान्यलक्ष्मी घरी येते.
 बंगालमध्येही वैशाख प्रतिपदेपासून वर्ष सुरू होते. या दिवसापासून वहीची पूजा करून नवीन खाते उघडतात.
 भारत हा विशाल देश आहे. त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार वर्षाचा पहिला दिवस ठरविला गेला तरी, त्यामागे धान्यलक्ष्मीच्या आगमनाचा भूमीच्या 'सुफलीकरणाचाच सत्कार करण्याची भूमिका असते.
 फाल्गुन, चैत्र, वैशाख हे प्रखर उन्हाचे महिने. या महिन्यांतील स्त्रियांची

२५८
भूमी आणि स्त्री