पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करतात. १८ सवाष्णींना जेवण देतात. प्रत्येकीची नारळाने ओटी भरतात. या पूजेत लिंबाचे... निंबाचे महत्त्व असते. पाण्याच्या घागरीत लिंबाच्या डहाळ्या ठेवतात. राजस्थानातील स्त्रियांच्या व्रतांत लिमडी मातेला लिंबाच्या झाडाला विशेष महत्त्व असते.
 राजस्थानात गणगौरीची पूजा करताना खालील गीत उच्चारतात -

गौर गौर गोमती
ईसर पूजा पारबती
म्हे पूजां आलानिला
गौर का सोना का टिका
म्हाकं हे कुकूका टिका
टिका दे टमका दे रानी
वरत करे जो राजारानी

 गौरी मागे 'गण' हे विशेषण वा शब्द येतो. महाराष्ट्रात गौरीगणपती एकदम येतात. या शब्दांतून सूचित होणारे संकेतही एका दिशेने जाणारे आहेत. महाराष्ट्रातही चैत्रगौरीच्या पूजेच्या वेळी वेळणीत वा कुंडीत धान्य पेरतात. अशाच प्रकारची गणगौर राजस्थानाप्रमाणे हरियाणातही पूजीली जाते. ही पूजा सामूहिकरीतीने साजरी करतात. मातीच्या गौरी व गौरा (शंकर) यांचे मिरवत, गाणी गात, पाण्यात - नदी, विहीर, तळे - विसर्जन करतात. गणगौर मध्य प्रदेशातील निमाड भागातही अत्यन्त थाटात साजरी होते.
 भारतातील चैत्रपाडवा -
 चैत्र पाडवा भारतातील अनेक प्रांतातून साजरा होतो. काश्मीरमध्ये चैत्राला चिथुर म्हणतात. पाडव्याला नवरोज किंवा नवरेह म्हणतात. या दिवशी शारदेच्या मंदिरात जाऊन सरस्वतीची पूजा करतात. हिंदू-शिख-मुस्लिम सर्व जण देवीस फुले वाहतात. आदल्या रात्री एका थाळीत, तांदूळ, मीठ, बदाम, दही, फुले, रुपया, आरसा, नव्या वर्षाचे पंचांग ठेवतात. नवरेहच्या पहाटे घरातील सून पहाटे

भूमी आणि स्त्री
२५७