पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे -
 भारतातील आदिम समाजाचाही शेती हा प्रमुख उद्योग वा जीवनवृत्ती होती. मात्र जीवनाच्या प्रथमावस्थेत असलेल्या माणसाला निसर्गक्रियांमागचा कार्यकारण भाव उमजलेला नव्हता. निसर्गशक्तींच्या मुळाशी ईश्वरी प्रेरणा असल्याची कल्पना त्याच्या मनात स्फुरलेली नव्हती. मात्र पाऊस पडल्यावर मातीतून हिरवाई बहरते तसेच स्त्रीलाच मूल होते हे त्याला निरीक्षणातून उमजले होते. निश्चित रूपाने लक्षात आले होते. प्राचीन काळी सर्वच देशांतील संस्कृतीत शेतीविषयक विधिविधानात स्त्रीला विशेष महत्त्व होते. 'वेदांतील स्त्रिया' या ग्रंथात डॉ. मधुकर आष्टीकर नमूद करतात की अगस्ती ऋषी हे आळशी होते. त्यांची पत्नी लोपामुद्रा हिने पतीच्या हातात फावडे देऊन त्यांना शेतातील कामात गुंतवले. मुदगलानी ही उत्तम नांगर चालवीत असे. बैलाच्या जागी स्वतःला गुंतवून ती नांगर चालवी. ऋग्वेदातील कृषीशी निगडित देवता 'स्त्री देवता' आहेत. पूर्व वैदिक काळात भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे होते. ज्या स्त्रीत संतती निर्माण करण्याची क्षमता आधिक तिला शेतीच्या कामात विशेष महत्त्व असे. समाजातही ती महत्त्वाची मानली जाई. श्रावण शुक्रवारी पूजिली जाणारी जीवंतिका उर्फ जिवती हे त्याचेच प्रतीक. प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ फ्रेझरने अशी अनेक उदाहरणे दिली आहेत उदा. - स्त्रियांनी नग्नावस्थेत नांगरणी, पेरणी करण्याची प्रथा अनेक देशांत होती. पावसाने भूमी सुफलित होते तशी स्त्रीही सुफलित होते अशी श्रद्धा होती. वंध्या स्त्री उघड्यावर पावसात न्हायली तर तिला गर्भधारणा होते असा समज आजही रुढ आहे. प्राथमिक कृषिसमाजात भूमी सुफलित करण्याचे विधी प्रायः स्त्रीकडेच असत. आजही काही ग्रामदेवतांचे पुजारीपण स्त्रीकडे असते. पुरुषाकडे असल्यास त्याला स्त्रीवेश धारण करावा लागतो. आर्यांच्या कृषिदेवता स्त्रीरूपीच आहेत. उदा. - उर्वरा, सीता, यजा, अनघा, अरदा, भूती, समा इत्यादी. या कृषिदेवता गोभिल व पारस्कर सूत्रात सांगितल्या आहेत. वास्तविक पाहता वैदिक आर्यांची जीवन पद्धती पुरुषप्रधान होती. त्यांच्या जीवनपद्धतीत पुरुष या संकल्पनेला विशेष महत्त्व होते. वैदिकांच्या कृषिदेवता स्त्रीरूपी असल्या तरी उषस् चा अपवाद वगळता महत्त्वाच्या सर्व देवता पुरुषरूपी होत्या. मात्र कृषिदेवता स्त्रीरूपी होत्या. आजही काही शेतकरी शेताचा एक तुकडा कापणी न करता ठेवतात. त्याचा उपयोग वाटेचा वाटसरू,गुरे यांच्यासाठी केला जातो. त्या तुकड्यात कोकणात सीतादेवी किंवा शीतलादेवी म्हणतात. कापणी

भूमी आणि स्त्री
२१