Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गोपालक वैदिकांनी कृषिजीवनाचा स्वीकार केला -
 वैदिकांनी त्यांच्या रीतिरिवाजांचे रोपण भारतात स्थिरावताना केले. मुळात ते गोपालक असले तरी त्यांनीही कृषिजीवनाचा स्वीकार केला. त्यांना कृषिविद्या अवगत होती. ऋग्वेद, अथर्ववेद, यांत कृषिविषयक उल्लेख मोठ्या प्रमाणावर आढळतात. पावसाच्या पाण्यावरची शेती आणि नद्यांना पाट, कालवे काढून केली जाणारी शेती त्यांना माहीत होती. शेती प्रामुख्याने पाण्यावर, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते याची जाण त्यांना होती. या वास्तवाचे त्यांना भान होते. ऋग्वेद, अर्थर्ववेदात कृषिविषयक उल्लेख आहेत. नांगरलेल्या जमिनीस उर्वरा म्हणत. (मराठी लोकभाषेत भाजीपाला ज्या जमिनीच्या तुकड्यात केला जोतो त्याला 'वावर' म्हणतात.) खणणे, शिंपणे या कर्मांनीयुक्त अशा सुपीक जमिनीस अप्नस्वती म्हणत. सीता, शुनासीर, क्षेत्रपती या शेतीच्या देवतांना उद्देशून ऋग्वेदात सूत्र आहे. तसेच जुगाऱ्यास सल्ला दिला आहे, की फाशांनी द्यूत खेळू नकोस शेती कर.
  अक्षर्मा दीव्यःकृषिमित् कृशस्व । (ऋ.१०.३४.१३)
 अश्वमेधाच्या वेळी गायल्या जाणाऱ्या वेदगीतातून पुढील आकांक्षा व्यक्त केली आहे.
  कृषिवृष्टिर्यजमानाय कल्पताम्। (तै.बा.३.१.२)
 (अर्थ : यजमानाची शेती सुफल होवो. शेतीस आवश्यक असा पाऊस पडो)
 ऋग्वेदात 'यव'याध्यान्याचा उल्लेख आहे. पुढील संहितातून मात्र व्रीही (तांदूळ), माष (उडिद), मुदग (मूग), तिल (तीळ), गोधूम (गहू), नीवर (तृणधान्ये) यांचा उल्लेख आहे. वैदिक आर्यांची शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून होती. ऋग्वेदात पावसाच्या प्रार्थना आहेत. वसिष्ठांचे पर्जन्यसूक्त -
  पर्जन्याय प्रगायत दिवस्पुत्राय मिळहुषे ।
  स नो यवसन्निच्छितु । (७.१०२.१)
 (अर्थ : आकाशपुत्रांनो जलवर्षक पर्जन्याची प्रर्थना करा. त्याची स्तुती करा. आम्हाला विपुल धान्य देण्याची त्याला इच्छा होवो.)

२०
भूमी आणि स्त्री