Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करताना शेवटच्या पेंढीस लक्ष्मी मानले जाते. शेतकरी समाजाची श्रद्धा आहे की शेवटच्या मुठीत धान्यलक्ष्मीचे सार असते.खळे केल्यावर खाली उरलेल्या धान्यास 'मातर' म्हणतात. ते फेकत नाहीत त्यातही लक्ष्मी असते. शेवटच्या पेंढीला सीतादेवी म्हणतात.
 ऋग्वेदात भूमीरूपी देवता सीता हिची प्रार्थना केली आहे.
 अर्वाची सुभगे भव सीते वन्दामहे
 यथा नः सुभगाससि यथा नः सुफलाससि॥
 (अर्थ : भाग्यशालिनी सीते इकडे आगमन कर. आम्ही तुला वंदन करतो. कारण तेणे करून तू आम्हाला भाग्यदायिनी होतेस.)
 संघर्ष स्वीकार आणि समन्वय -
 बीजाचे महत्त्व कळल्यानंतर पितृपूजेला सुरूवात झाली असावी. एका विशिष्ट काळानंतर जगभरच्या प्राचीन संस्कृतीत दैवी दाम्पत्ये निर्माण झालेली दिसतात. इजिप्तमधील इसिस आणि होरस, ग्रीसमधील ही आणि इयुस, आशिया मायनरमधील सिबिली आणि अँटिस भारतातील शिव आणि गौरी तसेच विष्णु आणि लक्ष्मी. आर्यांपूर्वीचे एतद्देशीय लिंग व योनिपूजक होते. आर्यांना लिंगपूजा मान्य नव्हती. ते त्यांची 'शिश्नपूजक' म्हणून हेटाळणी करीत. लिंग हे सर्जनाचे व सुफलीकरणाचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाई. विष्णु ही देवतासुद्धा लिंगस्वरूपी असावी असे मानले जाते. विष्णु हे वृषाणिन् चे रूप असावे असे रा.द.रानडे 'वैदिक देवतांचे अभिनव दर्शन' यात मांडतात. लिंग आणि योनी संभोगाशिवाय सर्जन अशक्य आहे. हे लक्षात घेऊन वैदिकांनी शिवलिंग पूजेचा स्वीकार केला. भारताची सांस्कृतिक वाटचाल पाहता असे लक्षात येते की, संघर्ष, स्वीकार आणि समन्वय या तीन प्रक्रियांच्या अव्याहत चलनातून येथील संस्कृतीची जडणघडण झालेली आहे. काही देवातांचे रूपान्तर झाले. तर काहीचे उन्नयन झाले व त्या जनमानसात स्थिरावल्या. वृषाणिन् या लिंगरूप असलेल्या विष्णूचे आजच्या विष्णूत रूपान्तर झाले. लोकसंस्कृतीतील रूद्र देवता जी गुप्तपणे चोरी करणारी, वाटसरूंना लुटणारी, शत्रूवर बाण टाकणारी अशी, तर कधी 'दिशांचा अधिपती', पशूंचे पालन करणारी, यज्ञोपवित धारण करून गुणसंपन्न लोकांचे प्रतिपालन करणारी. अशी परस्परविरोधी सूक्ते यजुर्वेदात आहेत. या रुद्राचे पुढे उन्नयन होउन तो शिवात परिवर्तीत झाला

२२
भूमी आणि स्त्री