येतात. (राज्ञी व संज्ञा या नावाचे द्योतक) परंतु पुसातल्या पूजेत मराठवाड्यात वेगवेगळ्या जातीत वेगवेगळी रीत दिसते. मराठा समाजात पाटावर चंदनाचा सूर्यनारायण काढतात. शेजारी नागवेलीच्या पानावर राणूबाई काढतात. ब्राह्मण समाजात रांगोळीने फक्त सूर्य काढतात. बहुजन समाज, मांग समाज यात सूर्याशेजारी रांगोळीचीच राणूबाई काढतात. सूर्य प्रतिमेस हळदी-कुंकू, खोबरे, खारीक पानसुपारी वाहतात. आदित्याराणूबाईची कथा ऐकण्यासाठी जवळपासच्या महिला एकत्र येतात. कहाणी ऐकल्यावर जेवण करतात. एकवेळ निरंकार करतात. काही जणी दिवसभर उपास करतात. सूर्यास्ताच्या वेळी खडीसाखर खाऊन पाणी पितात. काही स्त्रिया दिवसभर उभ्या राहतात. जमिनीवर बसत नाही. त्यादिवशी विळीवर चिरत नाहीत. रवीने ताक घुसळीत नाहीत. सूर्याच्यावर चंद्र चांदण्या काढतात. स्त्रिया दिवसभर केस विंचरीत नाहीत. तसे केले तर केस सूर्याच्या तोंडात जातात अशी श्रद्धा ग्रामीण भागातील स्त्रीमनाची आहे. मार्गशीर्षापासून आरंभ करून प्रत्येक रविवारी सौरव्रत करावे असे हेमाद्रीने सांगितले आहे. मराठवाड्यातील अनेक स्त्रिया हे सौरव्रत मार्गशीर्ष ते फाल्गुनापर्यंत करतात. पौषाला भाकडमासही म्हणतात.
पौषातील महत्त्वाचा सण मकरसंक्रात -
संक्रान्तीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. महाराष्ट्रात संक्रान्त थाटात साजरी होते. संक्रान्तीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ थाटात केला जातो. या दिवशी स्त्रिया सवाष्णींना वाण वाटतात.
सक्रान्तीच्या आदल्या दिवशी भोगीला १२ भाज्यांची, मिसळीची भाजी, राळ्याचा भात, बाजरीला तीळ लावून केलेली भाकरी असा बेत असतो. शेतात भाज्या भरपूर असतात. गाजर, वांगी, टमाटे, मेथी, तांदूळजा, पालक, अनेक भाज्या... या खास बेताचा नैवेद्य देवाला दाखवतात.
संक्रांतीला ५ सुगडी आणतात. त्यांना काव, चुना लावून रंगवतात. झाकणी एकच असते. या सुगड्यात तीळ, तांदूळ, टहाळ, उसाचे करवे इत्यादी टाकतात. त्या सुगड्यांवर खण टाकतात. त्यांची पूजा करतात. सुगडी घेऊन वाणवसा घेऊन देवळात जातात.तिथे सवाष्णींची हळदकुंकू लावून पूजा करतात. देवीला रुक्मिणीला वाणवसा लुटतात. त्यानंतर इतर सुवासिनींना सौभाग्यवाण देतात. बरोबरची सुगडी
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४८
भूमी आणि स्त्री