पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अर्जुन, भीम या चारही पुत्रांचे पिता वेगवेगळे आहेत. या वाटचालीत भूमीच्या पूजेत पाच पांडव कोपीत बसवले गेले असावेत का? त्यांच्या पुढ्यात दिवे लावले जाण्याची रीत आणि कुंती व द्रौपदी त्यांच्याकडे तोंड करून परंतु कोपीबाहेर मांडलेल्या या परंपरा निर्माण झाल्या असाव्यात का? या सांस्कृतिक प्रवासात 'स्त्रीशूद्रादिक' ह्या शब्दातून स्त्रीचे सामाजिक मूल्य मांडले गेले असावे.
 आंध्रातील धुरपदा अत्यन्त विक्राळ, दारूचे हंडेच्या हंडे रिचवणारी आणि मांसाहारी आहे.

आई की ग धुरपताची । बईठक अवघड
पाठीमागं बकरं पडं । हिच्या ग पूजेचं
माय माझी धुरपता । तुजे चालले की बिगारी
म्होरं दारूच्या घागरी, धुरपता माय

 चेटकीण आणि बुद्धिमान स्त्री -
 संथाळ आदिवासींच्यातील एक कथा या ठिकाणी आठवते. पुरुष स्त्रियांना ज्ञानाच्या बळावर सतत सतावीत. स्त्रिया कंटाळल्या. त्यांचा देव डोंगरदेव हा विशिष्ट रात्री पुरुषांना ज्ञान देई. स्त्रियांनी ज्ञान मिळवण्याचे ठरवले. ज्या दिवशी डोंगरदेव...मारंग बुरंग ज्ञान देतो त्या दिवशी स्त्रियांनी पुरुषांना प्रचंड दारू पाजली. ते दारूत धुत्त झाले की पुरुषांचे कपडे घालून त्या डोंगरंदेवाकडे गेल्या. डोंगरदेव भोळा. त्याने ज्ञान पुरुषवेशातील स्त्रियांना दिले. तेव्हापासून स्त्रिया अधिक ज्ञानी व कुशल झाल्या. मग पुरुष परत डोंगरदेवाकडे गेले. देव त्यांना रागावला. म्हणाला तुमच्या चुकीमुळे तुमची ही स्थिती झाली. आता मी तुम्हाला हुशार, बुद्धिमान व कुशल स्त्रीला चेटकीण कसे ठरवायचे याची विद्या देतो. तेव्हापासून हजारो कुशल- हुशार, स्पष्टवक्त्या स्त्रियांना चेटकीण ठरवून समाजाने मारले. या अंधश्रद्ध प्रथेविरुद्ध विरसामुंडाने निकराने लढा दिला.
 इळाआवसेतील द्रौपदी आणि कुंती या आव्हान देणाऱ्या देवता आहेत. लोकमानसात द्रौपदी इतकी रुजली आहे की विक्राळरूपाची धुरपता ही त्यांनी आपलीच मानली.

भूमी आणि स्त्री
२४५