Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इळाआवसेला शेतातील सालदारांना विशेष करून मांग व्यक्तीला सन्मानाने जेवू घालतात. या दिवशी सालदारांनी वा मालकानी पत्नीसह रानात मुक्कामाला राहावे असाही रिवाज आहे.
 सारे सण, 'अत्यन्त महत्त्वाचे क्षण' साजरे करण्यात पुढाकार असतो स्त्रियांचा. स्वतःच्या अखत्यारीत काही गोष्टी त्या सहजपणे त्यात समाविष्ट करतात.पुरुषप्रधान संस्कृतीत 'सौभाग्य' पुरुषकेन्द्री झाले. सवाष्णी व्रतविधीत पुढे असतात. कोपीबाहेर मांडलेल्या द्रौपदी कुंतीपुढे दिवा लावला नाही तरी भूमीच्या ओटीचे सामान मात्र ठेवतात. ही चतुराई 'कर्मठ' स्त्रियांचीच.
 कर्नाटकातील करगा उत्सव -
 इळाआवसेतील किंवा एकूणच शेतीच्या पूजेत ५ दगडांना चुना लावून पाच पांडव म्हणून मांडले जाते व त्यांची पूजा केली जाते. इळाआवसेत द्रौपदी आणि कुंती यांचे दगडही मांडतात. या संदर्भात डॉ. डी. डी. कोसंबी१७ यांच्या Myth and Reality या ग्रंथात गॉडेसेस ऑफ बर्थ अँड डेथ या परिच्छेदात कर्नाटकात अत्यन्त श्रद्धापूर्वक साजऱ्या होणाऱ्या 'करगा' उत्सवाची माहिती देताना डॉ. कोसंबींनी काही बाबी नोंदविल्या आहेत. १. तिगला समाजाचा हा सुफलीकरणाचा वार्षिक विधी असतो. हा समाज उत्तर अर्काट जिल्ह्यातून आला असून तो बागायती शेती करणारा समाज आहे. २. करगा हा,'कुंभ' असतो. या कुंभासमोर पूर्वी पशुबळी देत असत. अलीकडे एक पशुबळी देतात. बाकीच्या बळींचे प्रतीक म्हणून लिंबे कापली जातात आणि उकडलेले धान्य ज्याला महाराष्ट्रात घुगऱ्या म्हणतात ते समोर ठेवले जाते. शेवटच्या मिरवणुकीत मुख्य प्रतिनिधी जो तिगला पुजारी घराण्यातील असतो, तो डोक्यावर कुंभ घेऊन पुढे असतो. मात्र त्याने स्त्रीवेष परिधान केलेला असतो. त्याच्या पत्नीने त्या काळात त्याच्यापासून दूर, दृष्टीसही न पडता राहायचे असते. प्रत्येक तिगला घरातून एक प्रतिनिधी पुढे येतो आणि धारदार शस्त्राने स्वतःला जखम करून घेतो. मात्र त्यातून रक्त येता कामा नाही. ती एक सत्त्वपरीक्षाच असते. या उत्सवाच्या संदर्भात डॉ. कोसंबी मत नोंदवितात की हा उत्सव आर्यांचा नाही. परंतु गेल्या २०० वर्षांत या उत्सवाचे ब्राह्मणीकरण उन्नयन होऊन तो धर्मराज युधिष्ठिराच्या देवळाशी जोडला गेला आहे. या घटात मंत्रांनी

२४६
भूमी आणि स्त्री