पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पौर्णिमेला भूमी विधवा होते अशी कल्पना कर्नाटकात रूढ आहे. या पौर्णिमेला हौर्त्सुल हुन्नवे (विधवा पौर्णिमा) असे म्हणतात. तर चैत्री पौर्णिमेस सवाष्णीची पौर्णिमा म्हणतात. मार्गशीर्षात पानगळीला प्रारंभ होतो. चैत्रात नवी पालवी फुटू लागते. इळा आवस परभणी, औरंगाबाद भागात मोठ्या प्रमाणावर साजरी होत नाही. परभणी भागात तिला 'इखण आवस' म्हणतात. इखण म्हणजे विळा. शेतीच्या अवजारांची पूजा करतात. भूमीचीही पूजा करतात.
 तेलंगणातील धुरपता आणि इळाआवसेतील द्रौपदी -
 तेलंगण, आंध्रातील धुरपता आणि इळा आवसेच्या मांडणीतील दगडाला चुना फासून केलेली द्रौपदी यांत काही साम्य असेल का?

गड चांदियाला जाता । धोंड्या धोंड्याला पूजिती
जोड नारळ फोडिती । धुरपता माय ǁ

 सर्वसाधारणपणे धर्माचे मुख्य असे दोन भाग असतात. एक तत्त्वज्ञानाचा तर दुसरा धर्मविधींचा, हिंदुधर्माची तत्त्वज्ञानाची चौकट भारतभर एकच दिसली तरी धर्मविधीमध्ये प्रांतानुपरत्वे वेगळेपणा आहे. येथील लोकजीवनात आलेल्या टोळ्या, आदिवासी येथे रुजतांना आपल्या वैशिष्ट्यांची भर घालीत गेले. जवळच्या प्रांतांचे लोकाचार एकमेकांत मिसळून गेले. इळाआवसेतली धुरपता ही तेलंगणातून मराठवाड्यात आली असावी. दक्षिण भारतात ज्या अष्टशक्ती पूजिल्या जातात त्यात ही एक आहे. १५डॉ. तारा परांजपे नोंदवतात की नांदेड जिल्ह्यातील पूर्वास्पृश्य जमातीचे लोक या देवीला मोठ्या संख्येने पूजतात. मात्र तेलंगणातील धुरपतामाय ही अत्यन्त विक्राळ, दारूची भोक्ती आहे. महाराष्ट्रात येताना तिचे रूप द्रौपदीशी मिळते जुळते झाले असावे आणि जोडीला कुंती आली असावी असेही वाटते.
 शेतात पूजेच्या वेळी मांडले जाणारे 'पाच पांडव' हा संकेतही आव्हान देणारा आहे.
 सायंकाळी चार वाजता दहिभाताचा नैवेद्य दाखवतात. तिळाच्या कांड्याचा हेडगा करून पेटवतात. तो हातात घेऊन शेताला प्रदक्षिणा घालतात. भोवतालच्या प्राणिमात्रांना बोलावतात. उदा. कोल्ह्यानो या अंबिल पिऊन जा असे म्हणतात.

भूमी आणि स्त्री
२४३