Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तोंडावर नागवेलीचे पान ठेवतात. खरिपाची सुगी नुकतीच झालेली असते. कापलेल्या धान्याच्या तणसांची... काड्यांची कोप तयार करतात, त्यात पाच दगडांना चुना लावून पांडव म्हणून मांडतात. कोपीच्या बाहेर पांडवांकडे तोंड करून कुंती आणि द्रौपदी यांचे दगड मांडतात. त्यांच्या मध्यात रंगवलेले गाडगे ठेवतात. नैवेद्यात कोंडोळी... मुटके (उकडलेले) असतात. यांनाच फळ असेही म्हणतात. बाजरी वा ज्वारीच्या पिठाचे दिवे लावतात. मात्र समोरील द्रोपदी व कुंतीसमोर हे दिवे आणि नैवेद्य ठेवत नाहीत. नैवेद्य ठेवला तरी दिवा मात्र चेतवून ठेवीत नाहीत. नैवेद्यात ज्वारी बाजरीचा खिचडा आणि घुगऱ्याही असतात. इळा आवसेला मांगाला व मांगिणीला बोलावून जेवू घालतात. त्यामुळे बरकत येते. भूमीत भरपूर धान्य येते अशी श्रद्धा आहे.
 द्रौपदी आणि कुंती कोपीबाहेर -
 शेताची पूजा त्या त्या भागातील ऋतुमानानुसार केली जाते. या पूजेत द्रौपदी, कुंतीचे दगड मांडतातच मात्र ते दगड कोपीबाहेर का मांडतात ? हे कोडे मनात अनेक प्रश्न निर्माण करते. शिवाय त्यांना विधिपूर्वक नैवेद्य, द्रोणात आंबिल वाहत नाहीत. समोर दिवाही लावत नाहीत .असे का? वास्तविक पाहता ही पूजा भूमीची 'इळा' देवीची आहे. हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीच्या प्रवाहात, 'देवी' सर्वश्रेष्ठ देवता होती ती दुय्यम झाली. ती कुणा श्रेष्ठ देवाची पत्नी बनली. भूमीचा पती कधी आकाशाच्या रूपात तर कधी सूर्याच्या रूपात कल्पिला गेला. मात्र लोकमानसात 'पार्वती' आदिमाया, लक्ष्मी, गौरी या सर्व देवता 'भूमी' च्या रूपात रुजल्या. लक्ष्मी विष्णुची पत्नी, सरस्वती गणेशाची पत्नी म्हणून कल्पिल्या गेल्या तरी नवरात्रात त्यांची उपासना स्वतंत्रपणे होते. गौरी ही शिवाची पत्नी. तिचे आणि शंकराचे नाते लोककथांतून समान कल्पिले आहे. तिच्या पूजेतही शंकर महत्त्वाचा नसतो.
 पाच पांडव शेताच्या पूजेत मांडतातच. पेरणीच्या वेळी, पेरण्या संपल्यानंतर ढवारा करतात तेव्हा पाच पांडव मांडतात. मात्र त्यावेळी कुंती आणि द्रौपदीचे दगड मांडीत नाहीत. इळा आवसेच्या मांडणीत ती भूमीची पूजा असूनही द्रौपदी, कुंती यांना पूजेत फारसे महत्त्व नाही. मात्र भूमीचे प्रतीक म्हणून त्या उपस्थित आहेत. भूमीची ओटी भरण्यासाठी आणलेले सामान द्रौपदीच्या समोर ठेवले जाते. मार्गशीष

२४२
भूमी आणि स्त्री