Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सटीचे नवरात्र म्हणजेच जेजुरीच्या खंडोबाचा षड्रात्रोत्सव. खंडोबाची मराठवाड्यातील महत्त्वाची ठाणी अशी. नळदुर्ग व अणदूर (धाराशीव), सातारे (औरंगाबाद), साडेगाव (औरंगाबाद), मालेगाव (नांदेड), पाली (बीड). हे दैवत धनगर, हटकर, गवळी, गुरव, मांग, ब्राह्मण, कुणबी आदी सर्व जातिजमातीत पूजिले जाते. खंडोबाचे मूळ नवरात्र सटीचे असले तरी चैत्र, पौष आणि माघ या तीन महिन्यांतील शुद्ध १२ ते वद्य १ असे प्रत्येकी ५ दिवस या दैवताची आराधना केली जाते. खंडोबा ही सकाम भक्तीची देवता असल्याने विविध तऱ्हेने नवस बोलले जात आणि आजही बोलले जातात. त्या नवसाच्या परिपूर्तीनंतर मुलगा वा मुलगी देवास वाहणे, दर्शनासाठी खेटे घालणे, कावडी (पाण्याच्या) घालणे, जागरण, तळी भरणे-उचलणे, दही भाताची पूजा बांधणे, लंगर तोडणे, देवाच्या नावाने 'वारी' (भीक) मागणे, वास्तू (देवळाची दीपमाळ वा ओवरी) उभारणे, बगाड गळ मानेस वा कमरेस टोचून लाकडाला टांगून घेऊन प्रदक्षिणा घालणे, पेटत्या विस्तवावरून चालणे इत्यादी आचार केले जातात. गेल्या काही वर्षांपासून मुरळी सोडण्यास शासनाने बंदी घातली आहे कारण या मुरळ्यांना नंतर वाममार्गास लावले जाते. पूजा बांधताना 'खंडोबाचा येळकोट' सदानंदाचा येळकोट' असा गजर केला जातो. खंडोबाचे विविधतेतून एकात्म झालेले रूप अभ्यासकांपुढे प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
 इळा + कोट : येळकोट -
 हे नवरात्र आश्विन नवरात्राप्रमाणेच भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेले आहे. या षडरात्रोत्सवातही घट मांडले जातात. 'येळकोट'ची व्युत्पत्ती, इळा + कोट. इळा म्हणजे पृथ्वी, कोट म्हणजे पूर्णपात्र, भरपूर. पृथ्वी म्हणजेच इळा सुफलित होऊन जगरूपी कोठार अन्नधान्याने भरुन जाऊ दे ही शुभकामना या षड्रात्रोत्सवामागे आहे असे वाटते. या संदर्भात रा. चिं. ढेरे यांच्या लोकदैवतांचे विश्व या ग्रंथातील 'महाराष्ट्राची श्रद्धा केंद्रे' या लेखात ते लिहतिात, 'शिवशक्तीचा थोरला मुलगा स्कंद कार्तिकेय. महाराष्ट्राचा लोकदेव खंडोबा तो स्कंदच अशी आपली समजूत आहे. जुन्या काळी स्कंदाचा उत्सव ज्या दिवशी होत असे, त्या दिवसाला मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला 'स्कंदषष्ठी' असे नाव होते. त्याच दिवशी खंडोबाचा उत्सव होतो. आज आपण तो दिवस 'चंपाषष्ठी' या नावाने ओळखतो.

भूमी आणि स्त्री
२३५