Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सायनाचार्य याचा अर्थ 'वृष्ट्युदकांना गर्भवदुत्पादकम्' असा देतात. सूर्य आपल्या स्वनिष्ठ प्रभावाने पृथ्वीला फळवितो. तिच्या ठायी बीजारोपण करतो. तिला प्रसवोन्मुख करतो. सूर्य सरस्वान् आहे. तो 'स-रस' आहे. सूर्य आणि जल यांचा निकटचा संबंध वैदिक कल्पनात रुढ होता.
 नांगराचा उपयोग : पुरुषप्रधान जीवन व्यवस्था समाजात रुजू लागली -
 प्राथमिक कृषिजीवी समाज मातृसत्ताक होता. शेती हाताने, कुदळ फावडे आदींच्या साहाय्याने केली जाई. शेती स्त्रिया करीत. समूहाने एकत्र येऊन एकमेकींच्या शेताला त्या सुफलित करीत असाव्यात. वर्षनाचे एक महत्त्वाचे कारण सूर्य आहे. तो बीजस्वरूपी आहे याचे भान समाजाला आले असावे आणि सूर्यपूजा भूमीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केली जाऊ लागली असावी. पूर्ववैदिकांनी कृषिकला स्वीकारली. उत्तरोत्तर त्यात नांगराचा प्रभाव वाढला. पुरुष केन्द्री समाजव्यवस्था होऊ लागली. 'मला माझ्या आईचे नाव माहीत आहे, बापाचे नाही' असे सांगणाऱ्या सत्यकामाची परंपरा संपली. पित्याचे नाव आणि कोणत्या कुळात जन्म या बाबींना महत्त्व आले. 'दैवायत्तंकुले जन्मः मदायत्तंतु पौरुषम्' असे अभिमानाने सांगणारा कर्ण 'सूर्य पुत्र' मानला गेला. तेजस्विता आणि पौरुष यांच्यातील अनुबंध अधिक कडवा आणि स्वयंभू झाला.
 मार्गशीर्ष ते वैशाख या काळातील स्त्रीव्रतांचे शोधन केल्यानंतर असे लक्षात येते की या व्रतात सूर्याची प्रत्यक्ष उपस्थिती आहे. भूमीवर्षन आणि सर्जन यांच्यातील अनुबंधातून आविष्कृत झालेली व्रते, सण, विधी, यांत 'भूमी' महत्त्वाची आहे. तिच्याबरोबर असलेला भुलोबा, भांगलोबा, वा शिव हा अध्याहृत आहे. पौष महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्योदय होण्यापूर्वी स्त्रिया स्नान करतात. पाटावर सूर्याची आकृती काढून उपवास करतात. सूर्योदयानंतर केस विंचरीत नाहीत. रथसप्तमीला सूर्यपूजा करतात. संक्रान्तीलाही सूर्यपूजा केली जाते.
 भूमीची सुफलनशक्ती वाढण्यासाठी वर्षनाइतकेच सूर्याच्या उष्णेतचे महत्त्वं असते. किंबहुना वर्षनाचे सामर्थ्य सूर्यात असते. जमिनीवरचे पाणी तो किरणांच्या माध्यमातून स्वतःत गोळा करतो. ते पाणी सूर्यगोलकात गेल्यावर त्यात अमृताची शक्ती येते. मार्गशीर्ष ते पौष या काळातील महत्त्वाच्या व्रतांत सूर्यपूजा ही केन्द्रस्थानी

भूमी आणि स्त्री
२२९