Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'मृत्तिका मंगल' म्हणतात. माती सुवर्णाइतकीच महत्त्वाची असते. म्हणूनच धर्मकृत्यांत मातीच्या कलशाला महत्त्व असते.
 घट बसविणे असे लोकभाषेत नवरात्राविषयी बोलले जाते. घट हे गर्भाशयाचे प्रतीक आहे. हे व्रत स्त्रियांचे आहे नवरात्रात विशेष करून कुमारिकांची पूजा केली जाते. भूमीच्या स्त्रीरूपांची आराधना या काळात करतात. कुमारिकांचे प्रतीक सरस्वती, लक्ष्मी ही सुवासिनी आणि अनिष्टापासून रक्षण करणारी काली. ज्येष्ठ आषाढात पेरलेले धान्य भाद्रपदात सतेज होऊ लागते. जणु त्याची कौमार्यावस्था संपून ते पणात येऊ लागते. आश्विनात दाण्यातले दूध पक्व होऊ लागते आणि दिवाळीत धान्यलक्ष्मी दाराशी येते. कौमार्यवस्थेतील धान्यलक्ष्मी, धान्याने शेतेभाते बहरलेली असतात, अशी सुवासिनी मातृरूपा धान्यलक्ष्मी या धान्याचे अनिष्टापासून रोगापासून रक्षण करणारी विघ्नहर्ती भवानी. ही तीन रूपे नवरात्रात पूजिली जातात. घटाचे वर नागवेलीच्या पानांची वा फुलांचीमाळ बंधतात. रोज एक नवी माळ असते. लोकभाषेत नवरात्राचा तिसरा वा सहावा दिवस असे म्हणण्या ऐवजी आज चौथी माळ पाचवी माळ आहे असे म्हणतात. काहींच्या घरी फक्त विड्याच्या पानांचीच माळ असते.
 मराठवाड्यातील व्रतांवर दक्षिणेचा प्रभाव -
 मराठवाड्यात देवीच्या साडेतीन पीठांपैकी तुळजापूर आणि योगेश्वरी ही पीठे आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव थाटात होतो. मात्र तुळजाभवानीचे मूळ नवरात्र शाकंभरीचे. चंपाषष्ठीपासून सुरू होणारे तर योगेश्वरी चे नवरात्र मार्गशीर्ष पौर्णिमेस संपणारे. असे असले तरी आश्विनातील नवरात्र या देवळांतूनही थाटात बसते.
 मुळात देवी हे पार्वतीचे रूप. भव म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे पार्वती. ही दोनही लोकदैवते आहेत. विंध्यपर्वताने भारताचे उत्तर आणि दक्षिण असे निसर्गतः दोन भाग पाडले आहेत. विंध्य पर्वताच्या अलीकडे महाराष्ट्र आहे.
 कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि केरळ हे दाक्षिणात्य प्रदेश. या दक्षिणात्य प्रदेशांच्या आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओरिसा बंगाल आदि उत्तरेकडील प्रान्त यांच्या मध्यात महाराष्ट्र येतो. महाराष्ट्रातील सांस्कृतिक

भूमी आणि स्त्री
२०९