Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवनावर या दोनही भागांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा प्रभाव पडलेला आहे. जळगाव, धुळे जिल्हे जे पूर्वी खानदेश या नावाने ओळखले जातात, त्यावर उत्तरेच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा प्रभाव आहे. उदा. खानदेशातील कानबाईचा कुलाचार, उत्सव जो रण्णा सण्णा या सूर्यदेवतांशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात एकूण सात जिल्हे, लातूरमधील उदगीर - निलंगा हे तालुके, उस्मानाबादेतील उमरगा हा तालुका, तसेच नांदेडमधील देगलूर व किनवट हे तालुके कर्नाटक व आंध्राला लागून आहेत. मराठवाड्यातील भूमीशी निगडित व्रते, सण, उत्सव तत्संबंधी गाण्यांवर तेलंगण, आंध्र कर्नाटक या दाक्षिणात्य संस्कृतीचा प्रभाव असल्याचे जाणवते. या संदर्भात नांदेडच्या डॉ. ताराबाई परांजपे यांच्या 'आंध्र महाराष्ट्र सांस्कृतिक अनुबंध' या संशोधन प्रबंधाच्या प्रस्तावनेत लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासक दुर्गा भागवत नोंदवतात, महाराष्ट्र - आंध्र - कर्नाटक हा दख्खनच्या अखंड पठाराचाच एक सलग भूभाग आहे. त्या तीन प्रांतांच्या भाषा भिन्न असून संस्कृती एकात्म आहे. जगाच्या कुठल्याही खंडात जा युरोपात, अमेरिकेत कुठेही जा, भाषा बदलली की संस्कृती बदलते. म्हणजे संस्कृतीचे मूळ भाषा असते. पण या विस्तीर्ण भूभागात तीन भिन्न भाषा असून संस्कृती एकरूपच आहे. १९पोचम्मा ही देवी तेलंगणातून मराठवाड्यात आली आहे. धुरपतामाय हे तिचे दुसरे नाव. धुरपता हा द्रौपदीचा अपभ्रंश, मराठवाड्यात जमिनीची उर्वराशक्ती म्हणजेच सुफलन शक्ती वाढण्याशी संबंधित विधीत दगडांचे पाच पांडव आणि कुंती, द्रौपदी करून मांडणे हे फार महत्त्वाचे आहे. त्या संदर्भात विषयानुरूप चर्चा पुढे येईलच.
 आंध्र कर्नाटकातील लिंगायत, रेड्डी, वडार, कोमटी आदी अनेक जातिजमाती महाराष्ट्रात येऊन स्थिरावल्या आहेत. अंबाजोगाईजवळील धर्मापुरी येथील शिलालेख कन्नड भाषेतील आहेत. या सातही जिल्ह्यांवर शेकडो वर्षे निजामाची सत्ता होती. त्यामुळे हैदराबाद तेलंगणाशी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शासकीय संबंध अनेक वर्षांपासून आहेत. तेलंगणातील जमिनीशी निगडित चळवळ, आर्यसमाजी चळवळ या भागातही होत्या. जिल्ह्यांच्या वेगळपणावर मात करणारे आगळे असे मराठवाडीपण या सातही जिल्ह्यांतील लोकमानसात सतत जागे असते. त्यातून सण उत्सव व्रते विधी विशेषकरून शेतीशी संबंधित विधीत

२१०
भूमी आणि स्त्री