Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 महाराष्ट्रातही नाग संस्कृती होती -
 महाराष्ट्राच्या समाजमनातील नागप्रतिमेचा विचार करताना येथील सामाजिक- सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. भारतात नागा हा मानवसमूह होता. आजही नागालँडमध्ये नागजमातीचे लोक राहतात. महाराष्ट्रातही नागांची वस्ती असावी. पैठण, नागपूर, नाशिक, कोल्हापूर परिसरात या जमातीच्या लोकांच्या वसाहतीच्या खुणा सापडतात. पन्हाळा- पन्नगालय, नागांचे वसतिस्थान होते. महाराष्ट्रात जी चार प्रमुख राजघराणी होती त्यातील एक सातवाहनांचे. ज्यांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) तर उपराजधानी कोल्हापूर होती. हे राजघराणे नागकुलीन होते. त्यांचा एक प्रमुख राजा शेष हा होता. हा नागराज होता. सातवाहन हा शेषाचा पुत्र होता अशी कथा लोककथेत शिरली. श्री. व्यं. केतकरांच्या 'प्राचीन महाराष्ट्र, सातवाहन पर्वः विभाग दोन' मध्ये ते नोंदवतात की सातवाहन घराण्याच्या संस्थापकाची आई भावाजवळ राहत असे. ती कुमारी असताना माता झाली. ती ब्राह्मण होती. नाग जमाती मातृसत्ताक असल्यामुळे तीत पुरुषाला गौणत्व असते. पुरुषाचा संबंध फक्त वंशसातत्यापुरता असे. नाथपंथाच्या तत्त्वज्ञानात कुंडलिनीला नागीण स्वरूप मानले आहे. कुंडलिनी शक्तीचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी, नुकतीच कात टाकलेली, साडेतीन वेटोळे असलेली, कुंकुमाने न्हालेली नागीण असे म्हटले आहे. इथे ती ऊर्जा म्हणून येते. तेजाचे, प्रकाशाचे प्रतिनिधित्व करते.
 नागबंधाचा सांस्कृतिक प्रवास -
 नागजमातींचे मातृसत्ताक रूप, नागाचे क्षेत्रपालकत्व, नागाचे संतान दायित्व, नागाचे ऊर्जा वा तेजाचे प्रतीकरूप यांतून नाग या कल्पनाबंधाचे रूप मातृसत्ताक जीवन व्यवस्थेकडून पुरुषसत्ताक व्यवस्थेकडे जाताना कसे बदलत गेले याचा अंधुक आलेख आपल्याला जाणवतो.
 या सांस्कृतिक उन्नयनाच्या काळात नाग महाराष्ट्रात बंधूचे प्रतीक म्हणून स्थिर झाला असेल का असा विचार मनात येत राहतो. दक्षिणेकडे मातृसत्ताक द्रविडसंस्कृती स्थिर होती. उत्तरेकडून पुरुषसत्ताक आर्य संस्कृती भारतात पसरली. महाराष्ट्र प्रान्त उत्तर दक्षिणेच्या मध्यावरचा आहे. मातृसत्ताक कुटुंबात प्रमुखत्व स्वीकडे असे.

भूमी आणि स्त्री
१६७